शिक्षकांनो सावधान, निवडणुकीत प्रचार करताय?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2019 14:00 IST2019-10-16T14:00:50+5:302019-10-16T14:00:54+5:30
अकोला : सध्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला वेग आला आहे. प्रचार रॅली, सभांच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचण्याचा उमेदवार प्रयत्न करीत आहेत. ...

शिक्षकांनो सावधान, निवडणुकीत प्रचार करताय?
अकोला: सध्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला वेग आला आहे. प्रचार रॅली, सभांच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचण्याचा उमेदवार प्रयत्न करीत आहेत. गत निवडणुकीत अनेक उमेदवारांच्या प्रचारात खासगी शाळांसोबत, जिल्हा परिषद, मनपा, नगर परिषद शाळांमधील शिक्षकांचा सहभाग दिसून आला होता. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत निवडणूक आयोगाने निर्बंध लादत प्रचार रॅली, सभांमध्ये शिक्षक, मुख्याध्यापकांचा सहभाग दिसल्यास त्यांच्या नोकरीवर गंडांतर येणार आहे. तशा सूचना निवडणूक विभागाने जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
विधानसभा निवडणुकीत अनेक शिक्षक, मुख्याध्यापकांचे राजकीय पक्षांच्या नेत्यांसोबत, उमेदवारांसोबत संबंध आहेत. काही नातेवाईकसुद्धा आहेत. तसेच अनेक राजकीय नेत्यांच्या शैक्षणिक संस्था आहेत. त्यामुळे या उमेदवारांच्या समर्थनार्थ त्यांचा प्रचार, रॅली, सभांमध्ये शिक्षक, मुख्याध्यापक सहभागी होतात आणि मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतात; परंतु यावर निवडणूक आयोगाने निर्बंध घातले आहेत. त्यामुळे प्रचारात शिक्षकांचा वापर करणाºया राजकीय पक्षांना दक्षता घ्यावी लागणार आहे. यंदा होत असलेल्या विधानसभेच्या निवडणूक प्रचारात सहभाग घेणाºया शिक्षकांवर उमेदवारांच्या कार्यकर्त्यांची नजर राहणार आहे. जिल्ह्यात शिक्षक, मुख्याध्यापकांची संख्या मोठी असल्याने त्यांचा प्रचारात उपयोग व्हावा, यासाठी उमेदवारही प्रयत्न करतात. बदली, पदोन्नती किंवा इतर शैक्षणिक समस्या सोडविण्यासाठी नेते मंडळी कामी येते. त्यामुळे त्यांचे काम करण्यातही अनेक शिक्षक धन्यता मानतात. निवडणुकीमध्ये शेकडो शिक्षक उमेदवारांचे झेंडे खांद्यावर घेऊन प्रचार करतात. काही ठिकाणी तर मतदारांशी संपर्क साधण्याचे कार्यही शिक्षकांवर सोपविले जाते. ही बाब निवडणूक आयोगाच्या लक्षात आल्यामुळे त्यांनी शिक्षकांवर निर्बंध लादले आहेत. त्यामुळे प्रचारात शिक्षक दिसल्यास त्यांना नोकरी गमवावी लागणार आहे. (प्रतिनिधी)
उमेदवारावरही आचारसंहिता भंगचा ठपका
उमेदवारांच्या प्रचार रॅली, सभा, कॉर्नर मीटिंगमध्ये शिक्षक, मुख्याध्यापक आढळल्यास संबंधित उमेदवारावर आचारसंहिता भंग केल्याचा ठपका ठेवण्यात येणार आहे. यासंबंधीचे निर्देश निवडणूक विभागाने जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.
असा असेल शिक्षकांवर ‘वॉच’!
निवडणूक म्हटली की राजकीय पक्षांमध्ये धुमशान रंगते. आरोप-प्रत्यारोप, वाद-विवाद होतात. त्यामुळे राजकीय पक्षांच्या उमेदवारांच्या प्रचारात शिक्षक, मुख्याध्यापकांच्या सहभागावर राजकीय पक्षांच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांचेसुद्धा लक्ष राहणार आहे. तसेच निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार प्रचार सभा, बैठका, प्रचार रॅली यांचे व्हिडिओ चित्रीकरण करण्यात येते. चित्रीकरणात शिक्षक दिसल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याचा अधिकार जिल्हाधिकाºयांना देण्यात आला आहे.