Teacher creates Zero Budget Hand Wash Station! | शिक्षिकेने केली झीरो बजेट हॅन्ड वॉश स्टेशनची निर्मिती!
शिक्षिकेने केली झीरो बजेट हॅन्ड वॉश स्टेशनची निर्मिती!

अकोला: खासगी प्राथमिक शाळा, कॉन्व्हेंटमध्ये विद्यार्थ्यांना दर्जेदार हॅन्ड वॉशची व्यवस्था उपलब्ध आहे; परंतु जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना मात्र हात धुण्यासाठी हॅन्ड वॉश स्टेशनच नाही तर स्वच्छ पाणीसुद्धा उपलब्ध होत नाही. याची खंत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाचमोरी येथील शिक्षिका सुरेखा पागृत यांना होती. त्यांनी मनाशी चंग बांधत, झीरो बजेट हॅन्ड वॉश स्टेशनची निर्मिती केली आणि सोमवारी राष्ट्रीय शिक्षण दिनी हॅन्ड वॉश स्टेशन विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिले.
‘स्वच्छ भारत, स्वस्थ भारत, स्वच्छ विद्यालय’ या भारत सरकारच्या महत्त्वाकांक्षी उपक्रमांतर्गत प्रत्येक शाळेत विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजनापूर्वी हात धुण्यासाठी हॅन्ड वॉश स्टेशन असावे, असे अपेक्षित आहे. हात धुण्यामुळे अनेक आजारांपासून दूर राहता येते.आरोग्य उत्तम राहण्यास मदत होते. याच उद्देशाने अनेक खासगी शाळा, कॉन्व्हेंटमध्ये हॅन्ड वॉश स्टेशन उभारण्यात आले; परंतु जिल्हा परिषद, नगर परिषद प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांना हात धुण्यासाठी हॅन्ड वॉश स्टेशन तर दूरच हात धुवायला, प्यायला स्वच्छ पाणीसुद्धा मिळत नाही. अशा परिस्थितीत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाचमोरी येथील शिक्षिका सुरेखा पागृत यांनी स्वखर्चातून आणि स्वकृतीतून शाळेतील विद्यार्थ्यांसाठी हॅन्ड वॉश स्टेशनची निर्मिती केली आणि हे स्टेशन विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिले आहे. पाचमोरीचे पोलीस पाटील सैयद बादशाह यांनी राष्ट्रीय शिक्षक दिनी या हॅन्ड वॉश स्टेशनचे उद्घाटन केले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून उपसरपंच अरुणा खंडारे, बेबीताई वानखडे, सुमित्रा निंबाळकर उपस्थित होते. झीरो बजेट हॅण्ड वॉश स्टेशनची निर्मिती केल्यामुळे पोलीस पाटील सैय्यद बादशाहभाई यांनी शिक्षिका सुरेखा पागृत यांचे कौतुक केले. सोमवारी दिवसभरात विद्यार्थ्यांनी मध्यान्ह भोजन घेण्यापूर्वी हात स्वच्छ धुतले. हॅन्ड वॉश स्टेशन उपलब्ध झाल्यामुळे विद्यार्थी, पालकांनी समाधान व्यक्त केले. (प्रतिनिधी)

असे केले हॅन्ड वॉश स्टेशन तयार!

  • पाचमोरी येथील जि.प. प्राथमिक शाळेमध्ये जागेअभावी हॅन्ड वॉश स्टेशन उभारले नाही. हॅन्ड वॉश स्टेशन नसल्यामुळे विद्यार्थ्यांना हात धुता येत नव्हते. विद्यार्थ्यांना हात स्वच्छ धुण्यासाठी व्यवस्था कशी करावी, या प्रश्नातूनच शिक्षिका सुरेखा पागृत यांनी झीरो बजेटमध्ये वर्गात ठेवता येणारे हॅन्ड वॉश स्टेशन तयार केले.
  • त्यासाठी त्यांनी २५ लीटरची रिकामी कॅन आणली. तिला नळ बसवला अशाप्रकारे २० विद्यार्थ्यांमागे एक नळ संख्येनुसार हॅन्ड वॉश स्टेशन तयार केले. २५ लीटरची कॅन असल्यामुळे वापरासाठी सुरक्षित, दररोज स्वच्छ करता येणारी आणि कमी जागा बसणारी आहे.

 

Web Title: Teacher creates Zero Budget Hand Wash Station!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.