निलंबित अग्निशमन अधिकारी कर्तव्यावर; मनपाकडून 'शो कॉज'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2020 05:38 PM2020-06-02T17:38:51+5:302020-06-02T17:39:09+5:30

रमेश ठाकरे निलंबन काळात कर्तव्यावर हजर असल्याची तक्रार मनपा आयुक्तांकडे प्राप्त झाली.

Suspended fire officer on duty; 'Show Cause' from Akola Municipal corporation | निलंबित अग्निशमन अधिकारी कर्तव्यावर; मनपाकडून 'शो कॉज'

निलंबित अग्निशमन अधिकारी कर्तव्यावर; मनपाकडून 'शो कॉज'

googlenewsNext


अकोला : महापालिकेच्या अग्निशमन विभागाला साहित्याचा पुरवठा करणाऱ्या ‘मैक्सिन कंपनी’च्या कंत्राट प्रक्रियेत अनियमितता केल्याप्रकरणी प्रशासनाने निलंबित केलेले अग्निशमन अधिकारी रमेश ठाकरे निलंबन काळात कर्तव्यावर हजर असल्याची तक्रार मनपा आयुक्तांकडे प्राप्त झाली. ही बाब गांभीर्याने घेत उपायुक्त रंजना गगे यांनी रमेश ठाकरे यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
महापालिकेच्या अग्निशमन विभागात मोठ्या प्रमाणात अनागोंदी माजली आहे. या विभागाला हाताशी धरून मनपातील काही अधिकाऱ्यांकडून साहित्य खरेदीच्या प्रकरणांमध्ये आर्थिक अनियमितता केल्याचे समोर आले आहे. ‘मैक्सिन कंपनी’च्या साहित्य खरेदी प्रक्रियेत अनियमितता केल्याची तक्रार कंपनीच्यावतीने राज्य शासनाकडे करण्यात आली होती. त्यानुषंगाने राज्य शासनाकडून जिल्हा प्रशासनाला कारवाई करण्यासंदर्भात निर्देश देण्यात आले होते. प्राप्त निर्देशानुसार जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी प्रकरणाची सखोल चौकशी व तपासणी करून अग्निशमन विभाग प्रमुख रमेश ठाकरे यांच्यावर कारवाई करण्याचे निर्देश मनपा प्रशासनाला दिले. त्यावर मनपा आयुक्त संजय कापडणीस यांनी अग्निशमन विभाग प्रमुख रमेश ठाकरे यांना निलंबित केले. निलंबनाच्या काळामध्ये रमेश ठाकरे यांच्याकडून कर्तव्यावर हजर होणे अपेक्षित नाही; परंतु ते गणवेश घालून कर्तव्यावर राहत असल्याची तक्रार मैक्सिन कंपनीच्यावतीने मनपाकडे करण्यात आली. या तक्रारीची दखल घेत आयुक्त संजय कापडणीस यांच्या निर्देशानुसार मनपा उपायुक्त रंजना गगे यांनी रमेश ठाकरे यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

 

Web Title: Suspended fire officer on duty; 'Show Cause' from Akola Municipal corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.