अल्पभूधारक शेतकऱ्याची विष प्राशन करून आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2020 15:15 IST2020-01-15T15:15:10+5:302020-01-15T15:15:20+5:30
पिंपळखुटा येथील अल्पभूधारक शेतकऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी १४ जानेवारी रोजीच्या मध्यरात्री दोन वाजताच्या सुमारास उघडकीस आली आहे.

अल्पभूधारक शेतकऱ्याची विष प्राशन करून आत्महत्या
खेट्री : पातुर तालुक्यातील चान्नी पोलीस स्टेशन अंतर्गत पिंपळखुटा येथील अल्पभूधारक शेतकऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी १४ जानेवारी रोजीच्या मध्यरात्री दोन वाजताच्या सुमारास उघडकीस आली आहे. शेख सुलेमान शेख गफुर,४२ असे मृतकाचे नाव आहे. मृतक शेख सुलेमान व त्याचा भाऊ शेख सुलतान यांच्या नावाने सामूहिक २ एकर शेती आहे. सावकाराकडून कर्ज काढून त्यांनी दोन एकर शेतीमध्ये सोयाबीन व तूर पिकाची पेरणी केली होती. परंतु अतिवृष्टीमुळे सोयाबीन पिकांच्या उत्पादन मोठ्या प्रमाणात घट झाली आहे.तसेच तूर पिकावर विविध रोगांच्या प्रादुर्भावामुळे पिकांची पेरणी साठी लावण्यात आलेला खर्च ही निघत नसल्याचे न दर्शनास आल्यामुळे खचून जाऊन मृतक शेख सुलेमान यांनी मंगळवारी रात्री अकरा वाजता स्वतःच्या शेतात विष प्राशन केले.नंतर ते गंभीर अवस्थेत घरी आले . त्यांचे प्रकृती बिघडली होती . त्यांच्या नातेवाईकांनी त्याला उपचारासाठी चतारी ग्रामीण रुग्णालयात नेले असता, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने तेथील डॉक्टरांनी प्रथमोपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी सर्वोपचार रुग्णालय अकोला येथे हलविण्यात आले होते.अखेर मंगळवारी १४ जानेवारी रोजीच्या मध्यरात्री २ वाजताच्या सुमारास उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे. सर्वोपचार रुग्णालय येथे मृतदेहाची उत्तरिय तपासणी केली असून,त्यांच्यावर बुधवारी पिंपळखुटा येथे अंतिम संस्कार करण्यात आले आहे. त्याच्या पश्चात पत्नी दोन मुले एक मुलगी असा अपत्त परिवार आहे. याप्रकरणी वृत्त लिहीपर्यंत चान्नी पोलिसात कुठल्याही प्रकारची नोंद करण्यात आली नव्हती