चोरीस गेलेला ३५ लाखांचा मुद्देमाल केला परत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2020 19:26 IST2020-07-31T19:26:21+5:302020-07-31T19:26:33+5:30
पळविलेल्या दुचाकी आणि घरफोडीतील सुमारे ३५ लाखांच्या वर मुद्देमाल पोलिसांनी काही दिवसांमध्ये जप्त केला आहे.

चोरीस गेलेला ३५ लाखांचा मुद्देमाल केला परत
अकोला : जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून चोरीस गेलेले तसेच हरविलेले मोबाइल यासोबतच विविध शहरातून पळविलेल्या दुचाकी आणि घरफोडीतील सुमारे ३५ लाखांच्या वर मुद्देमाल पोलिसांनी काही दिवसांमध्ये जप्त केला आहे. हा मुद्देमाल संबंधित मालकास शुक्रवारी परत करण्यात आला. पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांनी राबविलेल्या विशेष मोहिमेनंतर सदरचा मुद्देमाल त्यांच्या मूळ मालकांना परत करण्यात आला आहे.
शहरासह जिल्ह्यातील २३ पोलीस ठाण्याच्या हद्दीतून गत काही दिवसांमध्ये मोबाइल चोरीच्या घटना घडलेल्या आहेत. यासोबतच अनेकांचे मोबाइल हरवल्या गेले आहेत. पोलिसांनी काही मोबाइल चोर अटक केल्यानंतर त्यांच्याकडून मोबाइल जप्त केले असून, हरविलेले मोबाइल जप्त केले आहेत. हे मोबाइल शुक्रवारी त्यांच्या मूळ मालकांना खातरजमा झाल्यानंतर परत करण्यात आले. जिल्ह्यातील असे १२७ मोबाइल त्यांच्या मूळ मालकांना परत करण्यात आले आहे. यासोबतच शहरासह जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरीस गेलेल्या ६७ दुचाकी जप्त करण्यात पोलिसांना यश आले असून, चोरट्यांकडून जप्त केलेल्या दुचाकी त्यांच्या मूळ मालकांना शुक्रवारी परत करण्यात आल्या आहेत. संबंधित उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी तसेच विविध पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांनी त्यांच्या हद्दीतील मूळ मालकांना चोरीस गेलेला हा मुद्देमाल परत केला आहे. यासोबतच घरफोडीतील मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, तो मुद्देमालही त्यांच्या मालकांना परत करण्यात आला आहे. ही मोहीम पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांच्या मार्गदर्शनात राबविण्यात आली असून, स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख शैलेश सपकाळ, सिटी कोतवालीचे ठाणेदार उत्तमराव जाधव, खदानचे ठाणेदार किरण वानखडे, ठाणेदार भानुप्रताप मडावी, रामदासपेठचे ठाणेदार मुकुंद ठाकरे, मूर्तिजापूरचे ठाणेदार शैलेश शेळके, ठाणेदार संतोष महल्ले यांच्यासह विविध पोलीस स्टेशनचे ठाणेदार व अधिकाऱ्यांनी त्यांच्या हद्दीतून चोरी गेलेला मुद्देमाल त्यांच्या मूळ मालकांना शुक्रवारी परत केला. यावेळी मूळ मालकांनी अकोला पोलिसांचे कौतुक करीत त्यांच्या कामगिरीविषयी आभार व्यक्त केले.