Sting operation : कुठेही बसा अन् खुशाल ढोसा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2019 13:21 IST2019-04-30T13:20:35+5:302019-04-30T13:21:38+5:30
अकोला: उघड्यावरच दारू विक्री अन् त्याच ठिकाणी खुशाल ढोसणाऱ्या तळीरामांचा गोतावळा शहरातील काही चौकांमध्ये सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार लोकमतने केलेल्या स्टिंग आॅपरेशनमधून उघडकीस आला आहे.

Sting operation : कुठेही बसा अन् खुशाल ढोसा
अकोला: उघड्यावरच दारू विक्री अन् त्याच ठिकाणी खुशाल ढोसणाऱ्या तळीरामांचा गोतावळा शहरातील काही चौकांमध्ये सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार लोकमतने केलेल्या स्टिंग आॅपरेशनमधून उघडकीस आला आहे. उघडपणे कायद्याचे उल्लंघन होत असले, तरी त्याकडे पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.
संवेदनशील शहर म्हणून अकोल्याची ओळख आहे. दररोज किरकोळ कारणावरून वाद आणि त्यातूनच अनेकदा मोठ्या घटना झाल्याचे अकोलेकरांसाठी नवीन नाही. अशा परिस्थितीत पोलिसांच्या नाकावर टिचून शहारातील मुख्य चौकात उघड्यावरच बेकायदेशीररीत्या दारू विक्री आणि तेथेच खुशाल दारू ढोसण्याचा प्रकार लोकमतने उघडकीस आणला आहे. वाढत्या गुन्हेगारीत शहरात कायदा व सुव्यवस्था कायम राखणे पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे; परंतु या प्रकारामुळे मुख्य चौकांतच मोठी घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
असे केले स्टिंग
गत दोन दिवसांपासून लोकमत चमूने सायंकळी ६ वाजतानंतर शहरातील काही मुख्य चौकांचा आढावा घेतला. यावेळी प्रामुख्याने आम्लेट पावच्या गाड्यांवर तळीरामांचा गोतावळा दिसून आला. आम्लेट पावच्या आॅर्डरसोबच डिस्पोझल ग्लासचीही व्यवस्था या ठिकाणी गाडी चालकाकडून केली जाते. तर काही ठिकाणी दारूही उपलब्ध करून देण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. हा प्रकार तहसील कार्यालयासोबतच गांधी चौक, धिंग्रा चौक, बाळापूर नाका, डाबकी रोड, अग्रसेन चौकातील चौपाटी, अकोट फैल, गौरक्षण रोड, खदान परिसरात लागणाºया काही आम्लेट पावच्या गाड्यांवर सुरू असल्याचे निदर्शनास आले.
हाकेच्या अंतरावर पोलीस ठाणे
उघड्यावर होत असलेली दारू विक्री आणि तळीरामांचा जमणारा गोतावळा, ही स्थिती ज्या चौकांमध्ये आहे त्या ठिकाणांपासून हाकेच्या अंतरावर पोलीस ठाणे आहेत. शिवाय, पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या समोरच हा प्रकार घडत आहे. असे असले, तरी याकडे राज्य उत्पादन शुक्ल व पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.
काय म्हणतो कायदा?
मुंबई दारूबंदी अॅक्टनुसार, सार्वजनिक ठिकाणी दारू विक्री आणि दारू पिण्यास बंदी आहे. असे करणाऱ्यांना तीन वर्षापर्यंतची शिक्षा होऊ शकते.
शहारात हा प्रकार होतो, हे वस्तुस्थिती आहे. मनुष्यबळ कमी असल्याने प्रत्येक ठिकाणी लक्ष देणे शक्य नाही. त्यामुळे पोलिसांच्या मदतीने उघड्यावर दारू पिणाºयांवर मुंबई दारूबंदी कायद्यानुसार कारवाया सुरूच आहेत.
- राजेश कावळे, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, अकोला