राज्यात विजेची तूट कायम
By Admin | Updated: June 4, 2014 23:52 IST2014-06-04T20:33:32+5:302014-06-04T23:52:43+5:30
देशातील वाढलेल्या वीज मागणीचा राज्याला फटका बसला असून नागरिकांना सोसावे लागते आकस्मिक भारनियमन

राज्यात विजेची तूट कायम
अकोला: गत तीन दिवसांपासून नागरिकांना आकस्मिक भारनियमनाचा सामना करावा लागत आहे. वाढलेल्या वीज मागणीमुळे राज्यात मोठय़ा प्रमाणावर विजेचा तुटवडा निर्माण झाला आहे. ही तूट भरून काढण्यासाठी अतिरिक्त विजेचा पुरवठा झाला नाही. देशभर विजेची मागणी वाढली असल्याने त्याचा फटका राज्याला बसला आहे. राज्यातील बहुतांश फिडर भारनियमनमुक्त झालेले आहेत. वीज गळतीनुसार पाडण्यात आलेल्या गटातील अ, ब, क आणि ड गट पूर्णपणे भारनियमनमुक्त आहेत. असे असले तरी तीन दिवसांपासून आकस्मिक भारनियमन केले जात आहे. विजेची वाढलेली मागणी आणि त्या तुलनेत उपलब्ध असलेली वीज यात मोठी तफावत आहे. ही तूट भरून काढण्यासाठी राष्ट्रीय ग्रीडमधूनही आवश्यक विजेचा पुरवठा महाराष्ट्राला झाला नाही. त्यामुळे आकस्मिक भारनियमन करावे लागत असल्याचे महावितरणच्या सूत्रांनी सांगितले. ही तूट भरून काढण्यासाठी वेगवेगळय़ा स्रोतांकडून २ हजार मेगावॅट वीज उपलब्ध करून घेण्यात आली. केंद्राच्या ग्रीडमधून १२00 मेगावॅट वीज बुधवारी मिळाली. अदानीचा ६६0 मेगावॅट आणि जेएसडब्ल्यूचा ३00 मेगावॅटचा संच पूर्ववत सुरू झाल्याने विजेची तूट काही प्रमाणात कमी झाली. त्यानंतरही क आणि ड या भारनियमनमुक्त असलेल्या गटांतील फिडरवरही १ तासाचे भारनियमन करावे लागले. अकोला शहरातील फिडरवरही भारनियमन याच कारणामुळे झाल्याचे महावितरणच्या सूत्रांनी सांगितले. गुरुवारसाठी ८00 ते १000 मेगावॅट वीज उपलब्ध करून घेण्यात आली असल्याने राज्यातील विजेची स्थिती सुधारण्यास मदत होणार आहे.