राज्याला मार्च २0१६ अखेर मिळणार ३२३0 मेगावॅट वीज!

By Admin | Updated: January 20, 2015 01:01 IST2015-01-20T00:31:04+5:302015-01-20T01:01:43+5:30

वीज उत्पादनात महाराष्ट्र देशात अग्रेसर; ग्रामीण भागातील भारनियमन संपण्याचे संकेत.

State will get 3230 MW electricity by March 2016 | राज्याला मार्च २0१६ अखेर मिळणार ३२३0 मेगावॅट वीज!

राज्याला मार्च २0१६ अखेर मिळणार ३२३0 मेगावॅट वीज!

राजरत्न सिरसाट/ अकोला : राज्यातील औष्णिक वीज केंद्रांच्या वीजनिर्मिती संचांचे काम अंतिम टप्प्यात आले असून, ते कार्यान्वित झाल्यानंतर येत्या मार्च २0१६ अखेर वीज उत्पादनात ३ हजार २३0 मेगावॅटची भर पडेल. या निर्मितीमुळे राज्य स्वयंपूर्ण तर होईलच, वीज उत्पादनात देशात अग्रेसर राज्य म्हणून ओळखले जाईल. या वीजनिर्मितीमुळे भारनियमनाच्या प्रचंड झळा सोसणार्‍या राज्यातील ग्रामीण भागातील शेतकरी, जनतेला दिलासा मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
राज्यात वर्तमान स्थितीत कोळशावर आधारित (थर्मल पॉवर) औष्णिक केंद्रांतून ७,९८0 मेगावॅट विजेची निर्मिती केली जात असून, पाण्यावर आधारित व इतर स्रोतांतून ३,२५७ मेगावॅट वीज तयार होते. राज्याची विजेची मागणी सध्या १५000 ते १५५00 मेगावॅट असून, महाजनकोचा पुरवठा हा ११,२३७ मेगावॅट एवढा आहे. याव्यतिरिक्त राज्यातील तिरोडा, अमरावती येथील खासगी वीजनिर्मिती केंद्रांकडून वीज विकत घेण्यात येत आहे. उर्वरित वीज राष्ट्रीय पॉवर ग्रीडमधून मिळत असल्याने भारनिमयमनाचा तडाख्यात सापडलेल्या या राज्यातील महानगर, शहरांची काळोखातून सुटका झाली आहे.
दरम्यान, राज्यातील चंद्रपूर येथील वीज प्रकल्पाच्या ८ व ९ क्रमांकाच्या दोन संचांचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. प्रत्येकी ५00 या प्रमाणे एक हजार मेगावॅट वीज उत्पादनात भर घालणार्‍या या प्रकल्पाचे काम जुलै २0१५ मध्ये पूर्ण होणे अपेक्षित होते. तथापि, या कामाला थोडा विलंब झाल्याने आता हा प्रकल्प मार्च २0१६ मध्ये पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होईल. बीड जिलतील परळी औष्णिक प्रकल्पाचे कामही अंतिम टप्प्यात आहे. १८३३ कोटींच्या या प्रकल्पाला आणखी ९१.६0 कोटी रुपये अतिरिक्त भागभांडवल लागणार होते. याकरिता शासनाची मान्यता मिळविण्यासाठी ऊर्जा मंत्रालयाकडे पाठपुरावा करण्यात आला होता. त्याची पूर्तता झाल्याचे वृत्त असल्याने, ३0 मार्च २0१५ पर्यंंत येथून वीजनिर्मिती सुरू होणार होती. तथापि, विलंब झाल्याने या प्रकल्पाची २५0 मेगावॅट वीजनिर्मिती आता मार्च १६ मध्ये सुरू होणार आहे. नागपूर जिलतील कोराडी औष्णिक वीज प्रकल्पाच्या ८ व ९ क्रमांकाच्या संचाचे काम पूर्ण झाले आहे तसेच संच क्रमांक १0 च्या विविध यंत्रांचे काम पूर्ण झाले आहे. या प्रकल्पाचे काम याच वर्षी पूर्ण होणे अपेक्षित होते. या कामालादेखील विलंब झाल्याने आता २0१६ मध्ये या प्रकल्पातून ६६0 मेगावॅट वीज मिळणार आहे.
राज्यातील तीन संचाचे काम पुर्ण झाले असून, मार्च १६ अखेर ३,२३0 मेगावॅट वीज या प्रकल्पातून सुरू होणार आहे. नाशिक,भुसावळ आणि पारस प्रकल्पांचे काम प्रस्तावित आहे. त्यापासून १,५७0 वीज राज्याला मिळणार असल्याचे महाराष्ट्र राज्य वीज महानिर्मिती कंपनी लिमिटेड,(महाजनको) जनसंपर्क अधिकारी महेश आफळे यांनी सांगीतले.

 

Web Title: State will get 3230 MW electricity by March 2016

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.