जलतरण तलावाच्या निकृष्ट बांधकामाकडे क्रीडा अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2019 14:38 IST2019-03-11T14:38:39+5:302019-03-11T14:38:47+5:30
अकोला: वसंत देसाई क्रीडांगण येथे संपूर्ण शहरासाठी एकमेव जलतरण आहे; परंतु जलतरण तलावातील टाइल्स अनेक ठिकाणी फुटलेल्या व तुटलेल्या आहेत. दुरुस्तीच्या नावाखाली संबंधित ठेकेदाराकडून थातूरमातूर दुरुस्ती करण्यात येत आहे.

जलतरण तलावाच्या निकृष्ट बांधकामाकडे क्रीडा अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे!
अकोला: वसंत देसाई क्रीडांगण येथे संपूर्ण शहरासाठी एकमेव जलतरण आहे; परंतु जलतरण तलावातील टाइल्स अनेक ठिकाणी फुटलेल्या व तुटलेल्या आहेत. दुरुस्तीच्या नावाखाली संबंधित ठेकेदाराकडून थातूरमातूर दुरुस्ती करण्यात येत आहे. याकडे कर्तव्यदक्ष समजले जाणारे जिल्हा क्रीडा अधिकारी आसाराम जाधव यांनी तत्काळ लक्ष द्यावे, अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने करण्यात आली आहे.
जलतरण तलावाचे कार्य हे जलदगतीने करून जलतरणपटूंना जलतरण तलाव लवकरात लवकर उपलब्ध करून द्यावा, अन्यथा या जलतरण तलावात बसून युवक काँग्रेसच्यावतीने आंदोलन करण्यात येईल, असे राष्ट्रवादी युवक उपाध्यक्ष बुढन गाडेकर यांनी सांगितले आहे.
दुरुस्तीच्या नावाखाली तीन महिन्यांपेक्षा अधिक कालावधीपासून बंद असलेला शहरातील एकमेव तरण तलाव उन्हाळ्याची चाहूल लागली तरीसुद्धा सुरू करण्यात आलेला नाही. जिल्हाधिकारी यांच्या निर्देशानुसार जलतरण तलाव १ मार्च रोजी सुरू होणार, अशी ग्वाही आसाराम जाधव यांनी हौशी जलतरणपटूंनी तक्रार केल्यानंतर दिली होती. मार्चचा एक आठवडा उलटूनही तरणतलाव अद्याप सुरू करण्यात आलेला नाही. थातूरमातूर टाइल्स बदलविण्याचे काम सुरू आहे. तेदेखील अत्यंत निकृष्ट दर्जाचे आहे. टाइल्स अशा पद्धतीने लावण्यात आलेल्या आहेत, की चावीसारख्या छोट्या वस्तूनेही या टाइल्स उखडल्या जातील. दुरुस्तीचे काम सुरू असताना जिल्हा क्रीडा संकुल समिती किंवा क्रीडा विभागाच्या एकाही कर्मचाऱ्याला या दुरुस्ती कामाकडे लक्ष द्यायला वेळ नाही. त्यामुळे मनमानी पद्धतीने येथे काम करणारे मजूर दुरुस्तीचे काम करीत आहेत.