कावड उत्सवात शिवभक्तांची मांदियाळी
By Admin | Updated: August 26, 2014 22:06 IST2014-08-26T22:06:00+5:302014-08-26T22:06:00+5:30
अकोलेकरांचा सर्वात मोठा उत्सव समजल्या जाणार्या कावड उत्सवात यावर्षी अभूतपूर्व उत्साह पाहावयास मिळाला.

कावड उत्सवात शिवभक्तांची मांदियाळी
अकोला : अकोलेकरांचा सर्वात मोठा उत्सव समजल्या जाणार्या कावड उत्सवात यावर्षी अभूतपूर्व उत्साह पाहावयास मिळाला. दरवर्षीप्रमाणे यावर्षीदेखील मोठय़ा प्रमाणात शिव मंडळ कावड उत्सवात सहभागी झाले होते. यावर्षी ३00 च्या वर लहान-मोठी पालखी मंडळे व ५00 च्या वर कावडधारी या उत्सवात सहभागी झाली होती.
** डाबकीरोडवासी शिवभक्त मंडळाची पालखी ठरली आकर्षणाचा केंद्रबिंदू
जुने शहरातील डाबकीरोड परिसरातील डाबकीरोडवासी शिवभक्त मंडळाची पालखी संपूर्ण कावड उत्सवाचे आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरली. या मंडळाने यंदा सर्वात मोठी पालखी तयार केली. यामध्ये ४५१ स्टिलचे हंडे आणि २0१ भोपळे मंडळाने पालखीला जोडले होते. भव्यदिव्य अशा या पालखीला पाहण्यासाठी भाविकांनी एकच गर्दी केली होती.
** कावड उत्सवात दिसले पोस्टर युद्ध
अकोल्याचा सर्वात मोठा उत्सव समजल्या जाणार्या कावड उत्सवात यावर्षी मोठय़ा प्रमाणात पोस्टर युद्ध अनुभवण्यास मिळाले. आकोट फैलपासून ते राजेश्वर मंदिरापर्यंत रस्त्याच्या दोन्ही कडेला रंगबिरंगी पोस्टर पाहावयास मिळत होती. आमागी विधानसभा निवडणूक लक्षात घेता अनेक राजकीय पुढार्यांनी आपल्या प्रचारासाठी पोस्टरचा चांगलाच उपयोग करून घेतला. सर्वात जास्त पोस्टर गांधी चौक, सिटी कोतवाली, जयहिंद चौकात आणि शिवाजी पार्क येथे पहावयास मिळाली. पोस्टर लावणार्यांमध्ये विविध राजकीय पक्ष, सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक संस्थांचा समावेश होता. शुभेच्छा देणारे हे फ्लेक्स पोस्टर आकर्षणाचे केंद्र बिंदू ठरले होते.
** मनपाच्या कारवाईनंतरही फलक झळकलेच
अकोला महापालिकेची परवानगी न घेता शहरात कावड यात्रा मार्गावर लावलेले शुभेच्छा फलक मनपा प्रशासनाने रविवारी रात्री काढले होते. मात्र सोमवारी पहाटे कावड यात्रा मार्गावर हे फलक झळकलेलेच दिसले. मनपा प्रशासनाच्या कारवाईला न जुमानता काही राजकीय पदाधिकार्यांनी हा खटाटोप केल्याची माहिती आहे. विधानसभा निवडणूक तोंडावर असून, कावड यात्रेदरम्यान शिवभक्तांना शुभेच्छा देऊन त्यांना आकर्षित करण्यासाठी काही राजकीय पदाधिकार्यांनी कावड यात्रा मार्गावर रविवारी रात्रीच फलक लावले होते. मनपा प्रशासनाची परवानगी न घेताच ठिकठिकाणी हे फलक लावण्यात आल्यामुळे रविवारी रात्री तणावाचे वातवरण निर्माण झाले होते. या प्रकरणामध्ये रात्री उशिरा सिटी कोतवाली पोलिस ठाण्यात तक्रारही झाली. मात्र सोमवारी पहाटे हे फलक पुन्हा जैसेथे होते. यावरून काही राजकीय पदाधिकार्यांनी मनपा प्रशासनाच्या कारवाईला न जुमानता कावड यात्रा मार्गावर शुभेच्छा फलक लावल्याचे दिसून आले.
** भाविकांसाठी ठिकठिकाणी महाप्रसाद
राजराजेश्वराला जलाभिषेक करण्यासाठी सोमवारी निघालेल्या कावड यात्रा मार्गावर शिवभक्तांसाठी ठिकठिकाणी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. काही शिवभक्त मंडळांनी ट्रकमध्ये अन्नपदार्थ आणूण भाविकांची महाप्रसादाची सोय केली होती. पोलिसांचे नियोजन असल्याने सोमवारी पहाटेपासूनच कावडधारी शहरात दाखल झाले होते. सायंकाळी ४ वाजेपर्यंत बहुंताश कावडधारी मंडळाने राजराजेश्वराला जलाभिषेक केला होता. या शिवभक्तांसाठी सोमवारी सकाळपासूनच महाप्रसादाची सुविधा उपलब्ध करण्यात आली होती.
** कावड उत्सवावर डिजेचे साम्राज्य
कावड उत्सवाचे वैशिष्ट्ये म्हणजे ठिकठिकाणी लावण्यात आलेले व पालख्यांच्या सोबत असलेले डिजे. डिजेचे फॅड मोठय़ा प्रमाणात वाढले आहे. कुठलाही सार्वजनिक कार्यक्रम असो डिजे वाजल्याशिवाय कार्यक्रमात रंगतच येत नाही. कावड उत्सवातदेखील डिजेचा प्रभाव मोठय़ा प्रमाणात पाहावयास मिळाला. चौकांमधे डिजे लावून शिवभक्त युवकांना प्रोत्साहित केले जात होते. जयहिंद चौक, सिटी कोतवाली, गांधी चौक, जुना कपडा बाजार, आकोट स्टँड, शिवाजी पार्क, आकोट फैल आदी ठिकाणी डिजे लावून शिवभक्तांना उत्साहित केले जात होते. येणारी प्रत्येक पालखी डिजे सुरू असलेल्या चौकात थांबत होती. डिजेच्या तालावर पालखीतील युवक थिरकत होते. युवकांच्या मागणीनुसार गाणे लावण्याची व्यवस्थादेखील अनेक ठिकाणी करण्यात आली होती. मात्र 'नमो नमा.. या गाण्याला युवकांची खास पसंती होती.
** बॅन्जो पाटर्य़ानी वेधले लक्ष!
कावड-पालखी उत्सवात ढोल-ताशाचा गजर करीत विविध बॅन्जो पाटर्य़ा सहभागी झाल्या होत्या. त्यामध्ये प्रामुख्याने धामणगाव रेल्वे येथील बॅन्जो पार्टी, वाशिम जिल्ह्यातल्या मालेगाव येथील ब्रह्मंड नायक म्युझिकल बँड पार्टी, साईनाथ बॅन्जो पार्टी व इतर बॅन्जो पाटर्य़ांनी भाविकांचे लक्ष वेधून घेतले. या बॅन्जो पथकांच्या तालावर शिवभक्त नाचण्यात धुंद झाले होत
** 'आता माझी सटकली..'
डिजेवर गाजली धून! कावड-पालखी उत्सवात सहभागी विविध पालखी मंडळांच्यावतीने ह्यडिजेह्णवर शिवभक्ती गीतांची धून वाजविली जात होती. त्यासोबतच अनेक गीतांच्या धूनवर शिवभक्त ताल धरीत होते. त्यामध्येच 'आता माझी सटकली.. मला राग येतोय' ही 'डिजे'वर वाजविण्यात येणारी धूनदेखील भािवकांचे चित्त वेधून घेत होती.
** कडेकोट पोलिस बंदोबस्त; कावड यात्रा शांततेत राजराजेश्वराला जलाभिषेक करण्यासाठी वाघोली येथून जल आणण्यासाठी रविवारी रात्रीच गेलेले हजारो शिवभक्त सोमवारी पहाटे पासूनच शहरात दाखल झाले. हजारो शिवभक्त खांद्यावर कावड घेऊन सोमवारी शहरामध्ये दाखल झाले. या कावड यात्रेदरम्यान जिल्हा पोलिस प्रशासनाने तगडा पोलिस बंदोबस्त तैनात केल्यामुळे कुठलाही वाद न होता कावड यात्रा महोत्सव शांततेत पार पडला. ८00 च्यावर पोलिस अधिकारी व कर्मचार्यांच्या बंदोबस्तात यात्रा शांततेत पार पडली. धार्मिक सण व उत्सवाच्या काळात शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी राज्य राखीव पोलिस दलाच्या जवानांची एक तुकडीही कावड यात्रा मार्गावर तैनात करण्यात आली होती. शहराच्या संवेदनशील भागात ठिकठिकाणी सुरक्षा कठडे उभारण्यात आले होते. वरिष्ठ पोलिस अधिकार्यांची गस्तही कावड यात्रा मार्गावर सतत सुरू होती. कावड यात्रा मार्गावरील तीनही पोलिस ठाण्याच्या हद्दीत १२ च्यावर ठिकाणांवर फिक्स पॉइंट लावण्यात आले होते. जिल्हा पोलिस अधीक्षक चंद्रकिशोर मिणा, अतिरिक्त पोलिस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील यांच्यासह १0 पोलिस निरीक्षक, २८ पोलिस उपनिरीक्षक, ५३0 पोलिस कर्मचारी, ५५ महिला पोलिस कर्मचारी, २00 होमगार्ड व ४८ महिला होमगार्डसह राज्य राखीव दलाच्या जवानांनी कडक बंदोबस्त ठेवला.