शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख ‘नाॅट रिचेबल’; पत्नीची पाेलिसांत तक्रार
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2022 20:18 IST2022-06-21T20:16:39+5:302022-06-21T20:18:17+5:30
ShivSena MLA Nitin Deshmukh : प्रकृती बिघडल्याने सुरत येथील हाॅस्पिटलमध्ये दाखल; पाेलिसांचा तगडा बंदाेबस्त

शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख ‘नाॅट रिचेबल’; पत्नीची पाेलिसांत तक्रार
अकाेला : शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षातील सुमारे ३० आमदारांसह बंडाचा झेंडा फडकावत सुरतमध्ये तळ ठाेकल्याने राज्यात राजकीय भूकंप आला आहे. यामध्ये अकाेला जिल्ह्यातील शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा बाळापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार नितीन देशमुख यांचाही समावेश आहे. दरम्यान, माझे पती बेपत्ता झाले असून, त्यांच्या जीविताला धाेका असल्याची तक्रार आ. देशमुख यांच्या पत्नी प्रांजली देशमुख यांनी मंगळवारी सिव्हिल लाइन पाेलीस ठाण्यात दाखल केल्यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
शिवसेनेतील नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षाविराेधात बंड पुकारत पक्षातील सुमारे ३० आमदारांसह मंगळवारी पहाटे सुरतमध्ये तळ ठाेकल्याचे समाेर येताच राज्यात राजकीय घडामाेडींना वेग आला आहे. यामध्ये सेनेचे जिल्हाप्रमुख आ. नितीन देशमुख यांचा समावेश असून, त्यांची सकाळी अचानक प्रकृती बिघडल्याने त्यांना उपचारासाठी सुरत येथील सिव्हिल हाॅस्पिटलमध्ये भरती करण्यात आले. दरम्यान, त्यांच्या पत्नी प्रांजली देशमुख यांनी सिव्हिल लाइन पाेलीस ठाण्यात आ. देशमुख बेपत्ता झाल्याची तक्रार नाेंदवली आहे.
राज्यसभा निवडणुकीपासून हालचाली
१० जून राेजी राज्यसभेच्या सहा जागांसाठी पार पडलेल्या निवडणुकीपासूनच पश्चिम विदर्भातील अकाेला, वाशिम व बुलडाणा येथील शिवसेनेच्या अंतर्गत गाेटात हालचालींनी वेग घेतला हाेता. यामध्ये बुलडाणा व वाशिम जिल्ह्यातील दाेन प्रभावी लाेकप्रतिनिधींनी प्रमुख भूमिका वठविल्याची माहिती आहे.
शिवसेनेच्या दोन आमदारांना गुजरातमध्ये मारहाण, संजय राऊत यांचा गंभीर आरोप
पक्षातील पदाधिकारी संभ्रमात
आ.देशमुख हे सेनेचे माजी केंद्रीय मंत्री तथा विद्यमान खासदार अरविंद सावंत यांचे विश्वासू मानले जातात. दुसरीकडे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाेबतही आ.देशमुख यांचे घनिष्ट संबंध आहेत. आ.देशमुख यांच्या राजकीय भूमिकेमुळे पक्षातील निष्ठावान पदाधिकारी संभ्रमात पडले असून जिल्ह्यात तर्कवितर्कांना उधाण आले आहे.
आमदार नितीन देशमुख हे कालपासून बेपत्ता असल्याबाबत त्यांच्या पत्नीने तक्रार दिली आहे. त्या तक्रारीनुसार तपास सुरू आहे. अद्याप गुजरात पोलिसांसोबत आमचा संपर्क झालेला नाही. आमदार देशमुख यांच्याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आली नाही. -जी. श्रीधर, पोलीस अधीक्षक