सर्वोपचारमध्ये सेवा देणा-या सात डॉक्टरांचे वेतन थांबविले!
By Admin | Updated: January 28, 2017 01:58 IST2017-01-28T01:58:34+5:302017-01-28T01:58:34+5:30
सर्वोपचारमधील वेतन घेऊन करतात खासगी वैद्यकीय व्यवसाय.

सर्वोपचारमध्ये सेवा देणा-या सात डॉक्टरांचे वेतन थांबविले!
अकोला, दि. २७-शासकीय आरोग्यसेवेत कार्यरत वैद्यकीय अधिकारी, डॉक्टरांना खासगी वैद्यकीय व्यवसाय करण्यास शासनाने बंदी घातली आहे; परंतु अनेक डॉक्टरांनी शासकीय नोकरीसोबतच स्वत:चे शहरात मोठे रुग्णालय उभारले. शासनाचे वेतन घेऊनही काही डॉक्टर शासकीय रुग्णालयांमध्ये कमी अन् स्वत:च्या रुग्णालयांमध्ये अधिक दिसून येत असल्याचे चित्र सध्या शहरात आहे. सर्वोपचार रुग्णालयात रुग्णसेवा करणारे सात डॉक्टर शहरामध्येसुद्धा वैद्यकीय व्यवसाय करीत असल्याची तक्रार आरोग्य संचालकांकडे करण्यात आली असल्याने, वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाने त्यांचे वेतन थांबविल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
शासकीय रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये सेवा देऊन शासकीय वेतन लाटणार्या डॉक्टरांना खासगी वैद्यकीय व्यवसाय करण्यास शासनाने मज्जाव केला. एवढेच नाही, तर महाराष्ट्र वैद्यकीय अधिनियमानुसार कोणत्याही डॉक्टरने कायद्याचे उल्लंघन केले, तर त्याला नोकरीतून बडतर्फ करून त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात यावा, असे नमूद केलेले आहे; परंतु अनेक डॉक्टर सर्रास वैद्यकीय अधिनियमाचे उल्लंघन करून स्वत:च्या रुग्णालयांमध्ये व्यवसाय करीत आहेत. अनेक डॉक्टर स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून शासकीय रुग्णालये, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये रुजू होतात. येथे जम बसल्यावर हे डॉक्टर शहरामध्ये रुग्णालय उभारून खासगीमध्ये वैद्यकीय व्यवसाय करून रुग्णांची लुबाडणूक करतात. एवढेच नाही, तर काही डॉक्टर शासकीय रुग्णालयांमध्ये येणार्या रुग्णांवर उपचार न करता त्यांना खासगी रुग्णालयांमध्ये जाऊन उपचार, शस्त्रक्रिया करण्याचे सुचवितात. असे प्रकार राजरोसपणे घडताना दिसून येतात.
येथील सर्वोपचार रुग्णालयामध्ये सेवा देणारे सात डॉक्टर शहरामध्ये स्वत:ची रुग्णालये उभारून खासगी वैद्यकीय व्यवसाय करीत आहेत.विशेष म्हणजे, हे सातही डॉक्टर दर महिन्याला शासनाला लाखो रुपयांचा चुना लावत असल्याची तक्रार आरोग्य संचालकांकडे करण्यात आली. तक्रारीमध्ये काही तथ्य आढळून आल्यामुळे या सातही डॉक्टरांचे वेतन वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाने थांबविले असून, त्यांची तक्रारही शासनाकडे केल्याची माहिती प्राप्त झाली आहे; परंतु सातही डॉक्टरांची माहिती किंवा त्यांची नावे देण्यास वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाने नकार दिला.
शासकीय सेवेतील अनेक डॉक्टरांची खासगी प्रॅक्टिस
सर्वोपचार रुग्णालय, सामान्य रुग्णालय आणि ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये सेवा देऊन लाखो रुपयांचे शासकीय वेतन लाटणारे अनेक डॉक्टर शहरात किंवा ग्रामीण भागात स्वत:ची रुग्णालये थाटून खासगी वैद्यकीय व्यवसाय करतात. हे शासकीय वैद्यकीय प्रशासनालासुद्धा ठाऊक आहे; परंतु या डॉक्टरांवर प्रशासन कारवाई करण्यात उदासीन असल्याचे दिसून येते.
सर्वोपचार रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सेवा देणारे काही डॉक्टर शहरात खासगी वैद्यकीय व्यवसाय करीत असल्याने, त्यांच्याविरुद्ध प्रशासनाला तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या तक्रारींची दखल घेत, आम्ही ही तक्रार आरोग्य संचालकांकडे पाठविली आहे, तेच यासंदर्भात कारवाईचा निर्णय घेतील.
- डॉ. राजेश कार्यकर्ते,
अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय.