ऑनलाईन प्रणालीत गुंतले वेतन
By Admin | Updated: May 12, 2014 00:04 IST2014-05-11T23:54:51+5:302014-05-12T00:04:55+5:30
ढिम्म प्रशासनाचा शिक्षकांना फटका

ऑनलाईन प्रणालीत गुंतले वेतन
मेहकर : शिक्षकांना वेतन मिळण्यासाठी प्रतिक्षा करावी लागणे हे काही नविन नाही. मात्र, ऑनलाईन पद्धत आल्याने तरी शिक्षकांचे वेतन वेळवर होईल अशी आशा बाळगुन असलेल्या शिक्षकांचे वेतन शालार्थ प्रणालीतच गुंतलेले आहे. शालार्थ प्रणालीचे काम संथ गतीने असल्याने शिक्षकांना वेतनासाठी प्रतिक्षा करावी लागत आहे. यामुळे शिक्षकांना आर्थिक अडचणींना समोरे जावे लागत असल्याचे चित्र आहे. शिक्षकांना त्यांचे वेतन वेळेवर मिळत नसल्याच्या तक्रारी शिक्षकांकडुन वारंवार होत आहेत. जिल्हा परिषदेच्या शिक्षकांना वेतन मिळण्यासाठी तर कित्येक दिवस वाटही बघावी लागते. शिक्षकांच्या वेतनासंदर्भात जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक शिक्षकांचे बिल तयार करतात. त्यानंतर सदर बिल गटशिक्षणाधिकार्यांकडे सादर केले जात होते. तेथून हे बिल गटविकास अधिकारी यांच्याकडे हस्तांतरीत केल्यानंतर केंद्रीय मुख्याध्यापक बँकेत पगाराचे धनादेश देत होते. त्यामुळे अनेकदा शिक्षकांच्या वेतनास विलंब लागत असल्याने; सण, उत्सव, लगीन सराई शिक्षकांना उधारीवरच भागवावी लागते. शिक्षकांचे वेतन वेळेवर करण्याची शिक्षक संघटनांनी अनेकवेळा मागणी केलेली आहे. त्यामुळे शिक्षकांचे वेतन महिन्याच्या एक तारखेलाच व्हावे यासाठी शासनाच्यावतीने ऑनलाईन वेतन देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. जिल्ह्यातील शिक्षकांना ऑनलाईल वेतन देण्यासाठी शालार्थ प्रणालीची कामे सद्यस्थितीत सुरू आहेत. मात्र, शालार्थ प्रणालीची कामे संथ गतीने होत असल्याने शिक्षकांचे वेतन दोन महिन्यांपासून रखडलेले आहे. ऑनलाईन वेतन प्रक्रियेच्या नावाखाली आणखी किती दिवस शिक्षकांना वेतनाची वाट पाहावी लागेल ? असा प्रश्न शिक्षकांमध्ये उपस्थित होत आहे. मार्च व एप्रील या दोन महिन्याचे संपुर्ण शिक्षकांचे पगार न होण्याला कारण प्राथमिक शिक्षणाधिकारी वैशाली ठग जबाबदार असल्याचा आरोप कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष नामदेव जाधव यांनी केला आहे. आतापर्यंत जि.प.ला प्रामुख्याने प्राथमिक शिक्षणाधिकारी यांचे पद प्रभारीवरच बरेच दिवस अवलंबुन होते. त्यामुळे अनेक निर्णय नियमात असतांनाही बरेच कामे होऊ शकली नसल्याने शिक्षकांच्या अनेक समस्या प्रलंबीतच आहेत. त्यानंतर जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या प्राथमिक शिक्षणाधिकारी पदावर आल्यातरीसुद्धा जिल्ह्यातील शिक्षकांवर समस्यांची टांगती तलवारच राहत आहे. यामुळे तालुक्यातील शिक्षकांमध्ये नाराजी दिसुन येत आहे.