रस्ते झाले निसरडे; अकोलेकरांनो जपून वाहने चालवा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2019 15:43 IST2019-08-28T15:42:57+5:302019-08-28T15:43:29+5:30
चिखलमय झालेल्या रस्त्यावरून दुचाकीसह चारचाकी वाहनेसुद्धा घसरत आहेत.

रस्ते झाले निसरडे; अकोलेकरांनो जपून वाहने चालवा!
अकोला: नियोजनशून्य कारभारामुळे शहरातील विकास कामे अकोलेकरांच्या जीवावर उठल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. अशोक वाटिका ते रेल्वे स्टेशन चौकपर्यंत उड्डाणपुलाच्या कामाला सुरुवात झाली असून, रस्त्याचे खोदकाम केल्यानंतर कंत्राटदाराने साफसफाई न केल्यामुळे आजरोजी रस्त्याच्या दोन्ही बाजूला प्रचंड प्रमाणात चिखल निर्माण झाला आहे. चिखलमय झालेल्या रस्त्यावरून दुचाकीसह चारचाकी वाहनेसुद्धा घसरत आहेत. यामुळे अकोलेकरांचा जीव धोक्यात सापडला असून, अशा निसरड्या रस्त्यांवरून वाहने सावकाश चालविण्याची गरज निर्माण झाली आहे.
आजरोजी शहरात कोट्यवधी रुपयांची विकास कामे सुरू आहेत. ही कामे होत असताना रस्त्याचे खोदकाम होऊन काही दिवस-त्रास सहन करावा लागेल, याची अकोलेकरांना जाण आहे; परंतु ही कामे करताना साहजिकच संबंधित प्रशासकीय यंत्रणा, कंत्राटदार आणि सर्वात महत्त्वाचे लोकप्रतिनिधींनी नियोजन करणे भाग आहे. शहरातील विकास कामांचा अनुशेष दूर व्हावा, यासाठी भाजपचे स्थानिक लोकप्रतिनिधी राज्य शासनाकडून कोट्यवधींचा निधी खेचून आणत असले तरी रस्त्यांचे दर्जाहीन निर्माण होत असल्यामुळे शासनाच्या निधीची केवळ लयलूट सुरू असल्याचे दिसून येत आहे. मागील काही दिवसांमध्ये खदान पोलीस ठाणे ते अशोक वाटिका ते रेल्वे स्टेशन चौकपर्यंत उड्डाणपूलाच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. रस्त्याच्या मधोमध खोदकाम केल्या जात असतानाच संबंधित कंत्राटदाराने त्या ठिकाणी साफसफाई करून माती उचलण्याची गरज आहे. तसे होत नसल्यामुळे ऐन पावसाळ््यात खदान पोलीस ठाणे ते थेट रेल्वे स्टेशन चौकापर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजू निसरड्या झाल्या आहेत. या मार्गावर सर्वाधिक वर्दळ राहते. त्यावरून वाहने चालविताना अकोलेकरांना कसरत करावी लागत असून, त्यांच्या जीवाला धोका निर्माण झाल्याचे चित्र दिसत आहे.