अकोला शहरातील मुख्य बाजारपेठेतील वरली अड्डयावर छापा; सहा जुगारी अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2018 16:30 IST2018-03-08T16:30:23+5:302018-03-08T16:30:23+5:30
अकोला - जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांच्या विशेष पथकाचे प्रमूख हर्षराज अळसपुरे यांनी जैन मंदिरामागील मटका बाजारात सुरु असलेल्या जूगार अड्डयावर छापेमारी केली.

अकोला शहरातील मुख्य बाजारपेठेतील वरली अड्डयावर छापा; सहा जुगारी अटकेत
- सचिन राऊत
अकोला - जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांच्या विशेष पथकाचे प्रमूख हर्षराज अळसपुरे यांनी जैन मंदिरामागील मटका बाजारात सुरु असलेल्या जूगार अड्डयावर छापेमारी केली. यावेळी सहा जुगारींना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडून तब्बल २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
शहराच्या मुख्य बाजारपेठेतील मटका बाजारात वरली अड्डा सुरु असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांच्या विशेष पथकाचे प्रमूख हर्षराज अळसपुरे यांना मिळाली. त्यांच्या पथकाने या ठिकाणावर पाळत ठेउन छापेमारी केल्यानंतर सहा जुगारींना ताब्यात घेतले. यामध्ये पोळा चौकातील रहिवासी केशव हरीभाउ गावंडे, खैर मोहम्मद प्लॉट येथील रहेमान शहा शौकत शहा, शिवाजी नगरातील रहिवासी विलास चंद्रकांत पखाले, खदान येथील रहिवासी रियाज अहेमद, वाशिम बायपासवरील पंचशील नगरातील रहिवासी बाबाराव वैद्यनाथ घुमरे तसेच वरुळ जउळका येथील रहिवासी राजेश विश्वनाथ घुगे या सहा जनांचा समावेश आहे. त्यांच्याकडून तब्बल २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. हा वरली अड्डा शिवसेनेचा एक माजी पदाधिकारी व कटारे नामक इसमाचा असल्याची माहिती विशेष पथकाच्या पोलिसांनी दिली.
जुगार अड्डे फोफावले
शहरासह जिल्हयात जुगार अड्डे मोठया प्रमाणात सुरु असून याला पोलिसांचाच राजाश्रय असल्याचे दिसून येत आहे. खुलेआम सुरु असलेल्या जुगार अड्डयावर विशेष पथक तसेच शहर पोलिस उपअधिक्षकांच्या पथकाकडून कारवाया करण्यात येत आहेत. मात्र इतर विभाग व पोलिस ठाण्यांचे याकडे दुर्लक्ष असल्याची माहिती आहे.