खासगी प्रवासी वाहन उलटले; एक ठार, १० जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2019 13:59 IST2019-01-28T13:58:55+5:302019-01-28T13:59:01+5:30
बार्शीटाकळी (अकोला): पिंजर येथून अकोल्याकडे येणारे खासगी प्रवासी वाहन उलटून एक ठार, तर १० प्रवासी जखमी झाले. ही घटना वरखेड फाट्याजवळ २७ जानेवारी रोजी सकाळी घडली. फुलसिंग माहारू राठोड रा. नादातांडा असे मृतकाचे नाव आहे.

खासगी प्रवासी वाहन उलटले; एक ठार, १० जखमी
बार्शीटाकळी (अकोला): पिंजर येथून अकोल्याकडे येणारे खासगी प्रवासी वाहन उलटून एक ठार, तर १० प्रवासी जखमी झाले. ही घटना वरखेड फाट्याजवळ २७ जानेवारी रोजी सकाळी घडली. फुलसिंग माहारू राठोड रा. नादातांडा असे मृतकाचे नाव आहे.
पिंजर येथून खासगी प्रवासी वाहन क्र. एमएच २६ एल ०३५६ ने १० ते १५ प्रवासी अकोला येथे येत होते. दरम्यान, वरखेड फाट्यावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने हे प्रवासी वाहन उलटले, तसेच रस्त्याच्या बाजूला असलेल्या झाडावर आदळले. या अपघातात फुलसिंग राठोड हे जागीच ठार झाले, तर वाहनातील इतर आठ ते दहा प्रवासी गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच बार्शीटाकळी पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेऊन जखमींना तातडीने सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. राठोड हे वडगाव येथे नातेवाइकांना भेटण्यासाठी आले होते. तेथून आपल्या गावी २७ जानेवारी रोजी जात असताना काळाने त्यांच्यावर झडप घातली. (तालुका प्रतिनिधी)
तीन दिवसांत दुसरा अपघात
बार्शीटाकळी तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून अवैध प्रवासी वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. २३ जानेवारी रोजी खासगी बसच्या धडकेत तिघे जण ठार झाले होते. त्यानंतर तीन दिवसात तालुक्यात दुसरा अपघात होऊन एक जण ठार झाला आहे. तालुक्यातील रस्त्यांचीही दुरवस्था झालेली आहे. या अवैध वाहतुकीकडे पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याने अनेकांचे बळी जात आहेत. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन अवैध वाहतूक बंद करण्याची मागणी होत आहे.