लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : सालासार बालाजी मंदिरात शांततेत बसलेले असलेल्या वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या उच्चशिक्षित प्रेमी युगुलास दामिनी पथकाने धाकदपट करीत ताब्यात घेतले. त्यानंतर जुने शहर पोलिसांना त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याच्या सूचना केल्या. संबंधित अधिकाऱ्याने काय गुन्हा दाखल करावा तसेच उच्चशिक्षित दोघांच्याही भविष्यावर प्रश्न उपस्थित होणार असल्याने यासंदर्भात विचारणा करताच या पथकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती दिली. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रेमी युगुलावर गुन्हा दाखल करण्यासाठी दबाव आणताच जुने शहर पोलीस स्टेशनमधील एक अधिकारी रजेवर गेल्याची माहिती आहे.वैद्यकीय शिक्षण घेत असलेले प्रेमी युगुल दोन दिवसांपूर्वी सालासार बालाजी मंदिरात पायऱ्यांवर बसलेले होते. यावेळी दामिनी पथक या ठिकाणी दाखल झाले. त्यांनी प्रेमी युगुलास ताब्यात घेऊन जुने शहर पोलिसांच्या स्वाधीन केले.त्यानंतर पोलिसांनी त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू केली; मात्र दामिनी पथकाने सदर दोघांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. शांततेत बसलेल्या प्रेमी युगुलावर काय गुन्हा दाखल करावा, अशी विचारणा पोलीस अधिकाऱ्याने करताच या प्रकाराची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना देण्यात आली. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने जुने शहर ठाण्यातील अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी दबाव आणताच काहीही गुन्हा नसलेल्या प्रेमी युगुलावर काय गुन्हा दाखल करावा, अशी विचारणा ठाण्यातील अधिकाऱ्याने केली. यावर संबंधित वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने आणखी दबाव आणताच ठाण्यातील अधिकारी अचानकच रजेवर गेल्याची माहिती आहे.एवढा आटापिटा का?गुन्हेगारांना सोडणाऱ्या, त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी १० वेळा विचार करणाऱ्या पोलिसांनी एका उच्चशिक्षित प्रेमी युगुलावर गुन्हा दाखल करण्यासाठी एवढा आटापिटा का केला, हा प्रश्न अनुत्तरित आहे. उच्चशिक्षित आणि तेही मंदिरात शांततेत ५० लोकांसमोर बसून असलेल्या प्रेमी युगुलावर गुन्हा दाखल झाल्यास त्यांच्या भविष्यावर डाग लागेल तसेच पोलिसांची प्रतिमा मलिन होईल म्हणून संबंधित अधिकाऱ्याने गुन्हा दाखल करण्याऐवजी प्रतिबंधात्मक कारवाई करण्याच्या सूचना केल्या होत्या.प्रेमी युगुलावर नेहमीच होते कारवाईपोलिसांनी आणि दामिनी पथकाने प्रेमी युगुलास पकडल्यानंतर त्यांच्यावर आजपर्यंत प्रतिबंधात्मकच कारवाई करण्यात आलेली आहे; मात्र या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यासाठी जिल्ह्याच्या पोलीस दलातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने एवढा इंटरेस्ट का घेतला, अशी चर्चा पोलीस खात्यात चांगलीच सुरू आहे.
प्रेमी युगुलावर गुन्हा दाखल करण्यासाठी दबाव
By admin | Updated: July 13, 2017 01:05 IST