सत्ता स्थापनेचा तिढा : कार्यकर्त्यांचा जीव टांगणीला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2019 12:40 PM2019-11-13T12:40:41+5:302019-11-13T12:40:50+5:30

राजकीय नाट्यामुळे युती दूभंगली तर महाशिवआघाडीसुद्धा अस्तीत्वात न आल्याने कार्यकर्त्यांचा जीव टांगणीला लागला आहे.

Political high voltage drama: Maharashtra assembly | सत्ता स्थापनेचा तिढा : कार्यकर्त्यांचा जीव टांगणीला!

सत्ता स्थापनेचा तिढा : कार्यकर्त्यांचा जीव टांगणीला!

Next

- राजेश शेगोकार 
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : भाजपचा बालेकिल्ला असलेल्या अकोल्यात यावेळी प्रथमच युतीमध्ये शतप्रतिशत यश मिळवून या किल्ल्यावर युतीचा झेंडा फडकविला होता; मात्र मुख्यमंत्री पदावरून राज्यात रंगलेल्या राजकीय नाट्यामुळे युती दूभंगली तर महाशिवआघाडीसुद्धा अस्तीत्वात न आल्याने कार्यकर्त्यांचा जीव टांगणीला लागला आहे.
सोमवारी रात्री राष्टÑवादी काँग्रेसला सत्तास्थापनेचे आमंत्रण मिळाल्यावर मंगळवार सकाळपासूनच सर्वच राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्याचे डोळे मुंबईकडे लागले होते. कोणत्याही क्षणी महाशिवआघाडीची घोषणा होईल या अपेक्षेत असलेल्या कार्यकर्त्यांचा आजही हिरमोड झाला. अखेर संध्याकाळी राष्टÑपती राजवट लागल्याचे समोर आल्यावर आता पुढील काही दिवस चर्चा अन् वाटाघाटीमुळे तेच चित्र समोर येणार असल्याने सर्वच पक्षांना सत्तेसाठी तडजोडी करण्यास वेळ मिळणार आहे. यामुळे आगामी काही दिवसानंतर सत्तास्थापनेचा आनंद व्यक्त करण्यासाठी सर्वच पक्षाच्या कार्यकत्याना प्रतीक्षा करावी लागणार आहे.
दरम्यान अकोल्यातील पाचही आमदारांना आता विधानसभा अस्तीत्वात येण्याची वाट पाहावी लागणार आहे. राज्यपालांनी राष्टÑपती राजवट लावल्याने जिल्हा प्रशासनावर सर्वाधीक जबाबदारी वाढली असून आता अधिकारी राज सुरू झाल्याची चर्चा प्रशासकी वर्तुळात होती.
 

भाजपच्या गोटात सुप्त आनंद

  •  नवरा मेला तरी चालेल, पण सवत रंडकी झाली पाहिजे अशी एक म्हण ग्रामीण भागात सर्रास वापरली जाते. भाजपाची अवस्था सध्या तशीच आहे.
  •  आपली सत्ता आली नाही; मात्र आपल्यावर दोषारोपण करून सत्ता मिळविण्यात शिवसेना अपयशी झाल्याचा आनंद भाजपच्या गोटात आहे.
  •  सर्वात मोठा पक्ष असल्याने आगामी काळात सत्ता आपलीच, असा विश्वासही अनेक कार्यकर्त्यांनी बोलून दाखविला.


शिवसैनिकांचा प्रचंड हिरमोड
 गेल्या पाच वर्षात भाजपासोबत सत्तेत राहूनही सापत्न वागणूक मिळाल्याचे शल्य मनात ठेवत युतीमध्ये निवडणूक लढविणाऱ्या शिवसेनेला भाजपाचे उट्टे काढण्याची संधी सत्तास्थापनेनंतर मिळणार होती. सोमवारी संध्याकाळपर्यंत सत्ता स्थापन होईल, या आनंदात जल्लोषाचीही तयारी सुरू होती; मात्र आकड्यांचे गणित हुकल्याने सेनेला सत्तेपासून दूर राहावे लागल्याने शिवसैनिकांचा प्रचंड हिरमोड झाल्याचे चित्र जिल्हाभरात होते.

कॉंग्रेस, राष्टÑवादीला लॉटरी लागण्याची अपेक्षा
विधानसभा निवडणुकीत तिसºया व चौथ्या क्रमांकाची मते मिळालेल्या राष्टÑवादी आणि काँग्रेस पक्षाचे सरकार येणे अपेक्षितच नव्हते; मात्र युतीचा काडीमोड झाल्याने काँग्रेस आघाडीला सत्तेची लॉटरी लागण्याची संधी निर्माण झाली आहे.
४येत्या काही दिवसात शिवसेनेसोबत काँग्रेस आघाडीचे गणित जमलेच तर जिल्ह्यात एकही आमदार निवडून न येताही या दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांना सत्तेची ऊब मिळणार आहे.


प्रशासनासमोर पहिलेच आव्हान अवकाळी पावसाच्या नुकसान भरपाईचे
गत महिनाभराच्या कालावधीत सतत बरसलेल्या अवकाळी पावसाने जिल्ह्यात पिकांचे प्रचंड नुकसान झाले. जिल्ह्यातील पीक नुकसानाचे पंचनामे करण्याचे काम पूर्ण करण्यात आले असून, सातही तालुक्यातील पीक नुकसान पंचनाम्यांच्या अहवालानुसार शेतकऱ्यांना मदतीचा लाभ देण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर उभे राहणार आहे. भरपाईची अपेक्षा व प्रत्यक्षात मिळणारा निधी यामध्ये मोठी तफावत झाल्यास शेतकºयांच्या रोषाचाही सामना प्रशासनाला करावा लागणार आहे.

Web Title: Political high voltage drama: Maharashtra assembly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.