Police officer suspended | उरळचे ठाणेदार तडकाफडकी निलंबित

उरळचे ठाणेदार तडकाफडकी निलंबित

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : उरळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत लोहारा येथे दोन समाजात दंगल झाल्यानंतरही घटनास्थळी दाखल न होता तसेच वरिष्ठांना कोणताही प्रतिसाद न दिल्यामुळे उरळचे ठाणेदार संजीव राऊत यांना मंगळवारी तडकाफडकी निलंबित करण्यात आले. आता उरळ पोलीस स्टेशनचा प्रभार सुनील सोळंके यांच्याकडे देण्यात आला आहे.
लोहारा येथील नवीन प्लॉटमध्ये दोन गटात एकमेकांवर तुफान दगडफेक केल्याची घटना सोमवारी रात्री घडली.
यामध्ये दोन्ही गटाचे दोन जण गंभीर जखमी झाले होते. घटनेची माहिती मिळताच बाळापूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्यासह पोलीस अधीक्षक अमोघ गावकर यांनी तातडीने धाव घेत घटनास्थळ गाठले. त्यानंतर गावात पोलिसांचा चोख बंदोबस्त लावण्यात आला असून, गावात तणावपूर्ण शांतता आहे. या घटनेच्या वेळी ठाणेदार संजीव राऊत हे घटनास्थळावर न दिसल्याने त्यांच्यासोबतच भ्रमणध्वनीवर संपर्क करण्यात आला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.
त्यामुळे पोलीस अधीक्षक अमोघ गावकर यांनी राऊत यांचा शोध घेतला असता ते नसल्याची माहिती मिळाली. गंभीर घटना घडल्यानंतरही ठाणेदार हजर नसल्याने त्यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे.


वैद्यकीय तपासणी केल्याची माहिती
दरम्यान, यावेळी ठाणेदार संजीव राऊत यांची वैद्यकीय तपासणी केल्याची माहिती आहे. त्यानंतर पोलीस अधीक्षक अमोघ गावकर यांनी या गंभीर प्रकरणाची दखल घेत राऊत यांना तडकाफडकी निलंबित केले. कर्तव्यात कसूर करणाऱ्यांवर अशाच प्रकारची कारवाई करण्यात येणार असल्याचेही पोलीस प्रशासनाद्वारे स्पष्ट करण्यात आले.

Web Title: Police officer suspended

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.