Police employee brutally beaten his wife im Murtijapur | पोलीस कर्मचाऱ्याची पत्नीस बेदम मारहाण
पोलीस कर्मचाऱ्याची पत्नीस बेदम मारहाण

अकोला -मुर्तीजापूर पोलिस ठाण्यात कार्यरत असलेला पोलिस कर्मचारी सतीष लक्ष्मनराव अघडते याने त्याच्या पत्नीस बेदम मारहाण केल्याची घटना सोमवारी सायंकाळी घडली. या मारहाणीत त्याची पत्नी गंभीर जखमी झाली असून तीच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या प्रकरणी सदर पोलिस कर्मचाºयाविरुध्द मुर्तीजापूर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुर्तीजापूर शहरातील ग्रामसेवक कॉलनीत रहिवासी असलेला सतीष लक्ष्मनराव अघडते याने त्याची पत्नी जयश्री हीला पोलिसांच्या काठीने बेदम मारहाण केली. तीच्या पाठीवर व पायावर काठीने मारहाण केल्यामुळे जयश्री यांना प्रचंड जखमा झाल्या असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. पोलिस कर्मचारी सतीष अघडते याने एखाद्या नराधमाप्रमाणे काठी तुटेपर्यंत पत्नीला मारहाण केल्याची माहिती मुर्तीजापूर शहर पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी तातडीने घटनास्थळ गाठून जयश्री यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. सतीष अघडते याने जयश्री यांच्या आई-वडीलांनाही अश्लील शिवीगाळ केली. त्यानंतर पोलिस घरी पोहोचल्याची माहिती मिळताच सतीष अघडते फरार झाला असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. या प्रकरणी जयश्री यांनी मुर्तीजापूर शहर पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी सतीष अघडते याच्याविरुध्द भारतीय दंड विधानाच्या कलम ४९८, ३२४, ५०४ नुसार गुन्हा दाखल केला आहे.
 
अघडतेवर निलंबनाची टांगती तलवार
सतीष अघडते याने पत्नीला बेदम मारहाण केल्याची माहिती वरीष्ठ पोलिस अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचताच त्यांनी अघडतेच्या निलंबनाचा प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे निर्देष दिले. तसेच त्याला तातडीने निलंबीत करण्यात येणार असल्याची माहिती आहे. अघडते याला येत्या दोन दिवसात निलंबीत करण्यात येणार असल्याचे वरीष्ठ पोलिस अधिकाºयांनी स्पष्ट केले.

 

Web Title: Police employee brutally beaten his wife im Murtijapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.