Paras teacher finally suspended! | अखेर पारस येथील शिक्षक निलंबित!

अखेर पारस येथील शिक्षक निलंबित!

अकोला: शालेय पोषण आहार वाटपातील अनियमितता आणि कर्तव्यात कसूर करणाऱ्या पारस येथील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक उर्दू शाळेतील शिक्षक शोयब अफसर अख्तर हुसेन यांना निलंबित करण्यात येत असल्याचा आदेश अखेर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) सौरभ कटियार यांनी २८ सप्टेंबर रोजी दिला. त्यामुळे कर्तव्यात कसूर करणे संबंधित शिक्षकास चांगलेच भोवले आहे.
जिल्ह्यातील बाळापूर पंचायत समिती अंतर्गत पारस येथील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळेतील शिक्षक शोयब अफसर अख्तर हुसेन यांच्याविरुद्ध जिल्हा परिषद सदस्य आम्रपाली खंडारे व प्रगती दांदळे यांच्यासह शिक्षण सभापतींनी तक्रार केली होती. त्यानुषंगाने शालेय पोषण आहार वाटपातील अनियमितता तसेच आर्थिक अनियमिततासंदर्भात तक्रारी प्राप्त झाल्याने आणि कर्तव्यात कसूर केल्यामुळे पारस येथील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक उर्दू शाळेतील शिक्षक शोयब अफसर अख्तर हुसेन यांना निलंबित करण्यात येत असल्याचा आदेश जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार यांनी दिला आहे.

लोकमतचा दणका
सदर शिक्षकाच्या निलंबनाचा प्रस्ताव तयार होऊनही जाणीवपूर्वक विलंब केला जात होता याची चर्चा जिल्हा परिषद वर्तुळात होती त्या चर्चेवर आधारित ‘लोकमत’ ने कुजुबज या सदरामध्ये सोमवारी वृत्त प्रकाशित केले होते त्याची दखल घेत सिईओंनी झाडाझडती घेतली. जिल्हा परिषदेतील पदाधिकाऱ्यांनी आपल्या प्रभावाचा गैरफायदा घेत निलंबन लांबविण्याच्या केलेला प्रयत्न या निमित्ताने उघड झाला. सोमवारी संध्याकाळ पर्यंत सीईओंनी पुर्ण माहिती घेत तक्रारीत तथ्य आहे प्रस्ताव तयार आहे तर विलंब कोणाच्या प्रभावाखाली थांबवीले याबाबत सामान्य प्रशासनासह शिक्षण विभागालाही चांगलेच खडसावल्याची माहिती आहे.

Web Title: Paras teacher finally suspended!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.