P International System Expands Vidarbha Network! | ‘पी इंटरनॅशनल सीस्टिम’ने विस्तारले विदर्भावर जाळे!  
‘पी इंटरनॅशनल सीस्टिम’ने विस्तारले विदर्भावर जाळे!  

- संजय खांडेकर

 अकोला : सव्वादोन हजार गुंतवा अन् घरबसल्या लाखो कमवा..., असे गोंडस आमिष देत पी इंटरनॅशनल सीस्टिमने विदर्भात कोट्यवधींच्या गुंतवणुकीचे जाळे विस्तारण्यास सुरुवात केली आहे. नागपूर, गोंदियाकडून झिरपत आलेली ही नेटवर्क सीस्टिम आता अकोल्यात दाखल झाली आहे. अल्पावधीतच या कंपनीचे तीनशे प्रतिनिधी अकोल्यात सक्रिय झाले आहेत.
२२५० रुपयांची गुंतवणूक आणि डाउन लाइनमध्ये केवळ दोन मेंबर करण्याची अट असल्याने या नेटवर्क सीस्टिमचे जाळे दिवसेंदिवस दूरवर पसरत चालले आहे. हजारो लोकांनी कोट्यवधींची गुंतवणूक केल्याने अनेकांना परतावा मिळत असल्याने दररोज शेकडो नवे गुंतवणूकदार आपसूकच जोडले जात आहेत. गुंतवणुकीच्या आठव्या स्टेपवर ३२ लाख देण्याचा दावा कंपनीने केला असला तरी अद्याप कुणालाही एवढी रक्कम मिळालेली नाही; मात्र अनेकजण कंपनीच्या आमिषाला बळी पडत आहेत. सव्वादोन हजार गुंतवा अन् घरबसल्या लाखो कमवा..., असा मॅसेज देणारे लोक अलीकडे अनेकांच्या अवती-भोवती फिरून गळ घालत आहेत. कंपनी विदेशाची असली तरी कंपनीचे अनेक प्रवक्ते तेलंगणा, आंध्र प्रदेशातील दिसत आहेत. याच प्रदेशातून पी इंटरनॅशनल नेटवर्क सीस्टिमचे जाळे झिरपत आता महाराष्ट्र आणि विदर्भात पोहोचले आहे. नागपूर, अकोलासह विदर्भातील ११ जिल्ह्यांत आतापर्यंत हजारो लोकांनी कोट्यवधींची गुंतवणूक केल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.
गत चार वर्षांपासून अनेकांनी लाखो रुपये कसे कमाविले, याचे दाखले देणारे अनेक व्हिडिओ व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि यू-ट्यूबवर टाकले जात आहेत. गुंतवणूक कशी करावी, म्हणजे आपण लखपती होऊ शकता... याचे दाखले देत लोकांना या जाळ्यात ओढल्या जात आहे. अकोल्यातही आतापर्यंत तीनशे लोकांचे नेटवर्क तयार झाले असून, नागपूर परिसरात हे जाळे मोठ्या प्रमाणात विणल्या गेले आहे. आॅटो पोल इन्कमचे टप्पे देण्यात आले असून, ४० ते ५० दिवसांत आणि ९० ते १०० दिवसांत किती रक्कम गुंतवणूकदारांना मिळेल, याची आकडेवारी देण्यात आली आहे. लाखो रुपये देण्याचे आमिष देत असलेल्या कंपनीचा व्यवसाय काय, याबाबत मात्र कुठेच स्पष्ट माहिती नाही. हजारो गुंतवणूकदारांना लाखोंचा परतावा मिळणार असल्याने अनेकजण यामध्ये सहजपणे जुळत आहेत. अनेकांचे संपर्क क्रमांक आणि पत्तेदेखील देण्यात आले आहेत; मात्र कंपनीच्या म्होरक्यांचा पत्ता नाही. कंपनीचे बरे-वाईट झाले तर मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे.

 

Web Title: P International System Expands Vidarbha Network!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.