इच्छुक उमेदवारांसाठी एक खिडकी योजना सुरूच नाही !
By Admin | Updated: January 28, 2017 01:55 IST2017-01-28T01:55:37+5:302017-01-28T01:55:37+5:30
अकोल्यातील स्थिती; कागदपत्रांची जुळवाजुळव करताना दमछाक.

इच्छुक उमेदवारांसाठी एक खिडकी योजना सुरूच नाही !
अकोला, दि. २७- महापालिका निवडणुकीमध्ये उमेदवारी अर्ज सादर करणार्या इच्छुक उमेदवारांची वेळेवर होणारी धावपळ लक्षात घेता, त्यांच्या सुविधेसाठी झोननिहाय गठित करण्यात आलेल्या निवडणूक कार्यालयात एक खिडकी योजना सुरू करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त अजय लहाने यांनी दिले होते. उमेदवारी अर्ज सादर करण्याच्या पहिल्या दिवशी एक खिडकी योजना सुरूच केली नसल्यामुळे इच्छुकांची दमछाक झाली.
राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार, महापालिका निवडणुकीसाठी २७ जानेवारीपासून उमेदवारी अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. झोननिहाय गठित केलेल्या पाच निवडणूक कार्यालयांमध्ये इच्छुकांना सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येतील. यादरम्यान, प्रचार सभा, रॅली, होर्डिंग्ज, बॅनर, फलक, प्रचार वाहने आदी विविध विषयांसाठी उमेदवारांना महापालिकेची रीतसर परवानगी घ्यावी लागते. या सर्व परवानग्या एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशातून प्रत्येक निवडणूक कार्यालयात एक खिडकी योजना कार्यान्वित करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त अजय लहाने यांनी निवडणूक विभागाला दिले होते. उमेदवारी अर्ज सादर करण्याच्या पहिल्या दिवशी निवडणूक कार्यालयात एक खिडकी योजना कार्यान्वित केले नसल्याचे चित्र समोर आले.
धावपळ अन् संभ्रम
उमेदवारांनी अर्जासोबत दोन शपथपत्रे सादर करायची आहेत. मालमत्तेसंबंधी विवरण आणि गुन्हे दाखल असल्यास त्याची माहिती अर्जासोबत जोडून देणे क्रमप्राप्त आहे. २00२ नंतर तीनपेक्षा जास्त अपत्ये नसल्याचा दाखला उमेदवारी अर्जासोबत जोडावा लागेल. खर्चासाठी स्वतंत्र बँक खाते उघडून त्याद्वारे खर्चाच्या नोंदी कराव्या लागतील. एबी फॉर्म उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंंत जमा करण्याची सवलत यंदा उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती आहे. ही माहिती देताना निवडणूक कार्यालयांमध्ये एकवाक्यता नसल्यामुळे इच्छुकांना नाहक धावपळ करावी लागत असण्यासोबतच कागदपत्रांसंदर्भात संभ्रमाची स्थिती निर्माण केली जात आहे.
रविवारी भरता येणार उमेदवारी अर्ज
निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांना यंदा ऑनलाइन प्रणालीद्वारे उमेदवारी अर्ज सादर करावा लागेल. त्याची प्रिंटआउट काढून निवडणूक कार्यालयातील निवडणूक निर्णय अधिकार्यांकडे सादर करावी लागेल. उमेदवारी अर्ज भरण्याचा कमी कालावधी लक्षात घेता, रविवारी (२९ जानेवारी)देखील उमेदवारी अर्ज भरण्याची सुविधा राज्य निवडणूक आयोगाने उपलब्ध करून दिली आहे.