पेरण्या उलटण्याचा धोका; शेतकरी चिंतेत!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2019 13:44 IST2019-07-13T13:37:09+5:302019-07-13T13:44:20+5:30
आणखी काही दिवस पावसाने हजेरी लावली नाही, तर खरीप पेरण्या उलटण्याचा धोका निर्माण झाल्याने, शेतकरी चिंतेत सापडला आहे

पेरण्या उलटण्याचा धोका; शेतकरी चिंतेत!
- संतोष येलकर
अकोला : जिल्ह्यात ९ जुलैपर्यंत २ लाख ७८ हजार ८५६ हेक्टर क्षेत्रावर (५८ टक्के) खरीप पेरण्या आटोपल्या असल्या तरी, सार्वत्रिक दमदार पावसाअभावी जमिनीत ओलावा कमी असल्याने, उगवलेली पिके कोमेजण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे आणखी काही दिवस पावसाने हजेरी लावली नाही, तर खरीप पेरण्या उलटण्याचा धोका निर्माण झाल्याने, शेतकरी चिंतेत सापडला आहे. त्यानुषंगाने जिल्ह्यात सार्वत्रिक दमदार पाऊस केव्हा बरसणार, याबाबत शेतकऱ्यांकडून प्रतीक्षा केली जात आहे.
जिल्ह्यात सरासरी ४ लाख ८० हजार ५२० हेक्टर खरीप पेरणीचे क्षेत्र असून, त्यादृष्टीने कृषी विभागामार्फत खरीप पेरणीचे नियोजन करण्यात आले आहे. यावर्षीचा पावसाळा सुरू झाल्यानंतर २० दिवसांचा कालावधी उलटून गेल्यानंतर जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली. त्यामुळे खरीप पेरण्या सुरू होण्यास विलंब झाला. जिल्ह्यात अद्यापही सार्वत्रिक जोरदार पाऊस बरसला नसून, कुठे कमी तर कुठे जास्त रिमझिम बरसलेल्या पावसात ९ जुलैपर्यंत जिल्ह्यातील सातही तालुक्यांत २ लाख ७८ हजार ८५६ हेक्टर क्षेत्रावर (५८ टक्के) खरीप पिकांची पेरणी आटोपली. पेरणीनंतर सार्वत्रिक दमदार पाऊस बरसला नसल्याने, जमिनीत ओलावा कमी असून, दुपारच्या वेळी तापत्या उन्हामुळे उगवलेली पिके कोमेजण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे आणखी काही दिवसांत जिल्ह्यात सार्वत्रिक दमदार पावसाने हजेरी लावली नाही, तर खरीप पेरण्या उलटण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यानुषंगाने दुष्काळी परिस्थितीत खरीप पेरणीवर केलेला खर्च पाण्यात तर नाही जाणार, अशी चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे. त्यामुळे सार्वत्रिक दमदार पाऊस केव्हा बरसणार, याबाबत जिल्ह्यातील शेतकºयांकडून प्रतीक्षा केली जात आहे.
जिल्ह्यात अशी झाली खरीप पेरणी!
पीक पेरणी (हेक्टर)
कापूस १०२६७३
सोयाबीन ११२६४५
तूर ३४४८८
मूग १२१८०
उडीद ९१८५
ज्वारी ७५३८
तीळ १४७
..................................................
एकूण २७८८५६
दुबार पेरणीचे सावट; शेतकºयांपुढे प्रश्न!
पेरणीनंतर उगवलेली पिके जमिनीत ओलावा कमी असल्याने, कोमेजण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे आणखी काही दिवसांत पाऊस न आल्यास दुबार पेरणीचे सावट निर्माण झाले आहे. दुष्काळी परिस्थितीत अडचणीत सापडलेल्या शेतकºयांनी खरीप पेरणीवर खर्च केला; मात्र आता दुबार पेरणीचा खर्च भागविणार कसा, असा प्रश्न शेतकºयांपुढे निर्माण झाला आहे.
दाटून येणारे ढग बसणार केव्हा? शेतकºयांचे डोळे आभाळाकडे!
दररोज आकाशात काळेभोर ढग दाटून येतात, पावसाचे वातावरणही तयार होते; परंतु पाऊस पडत नाही. त्यामुळे दाटून येणारे ढग बरसणार केव्हा आणि जिल्ह्यात सार्वत्रिक दमदार पाऊस होणार केव्हा, यासंदर्भात प्रतीक्षा करणाºया शेतकºयांचे डोळे आभाळाकडे लागले आहेत.