बाळापूर येथे भिंत कोसळून नऊवर्षीय बालकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:15 IST2021-07-11T04:15:00+5:302021-07-11T04:15:00+5:30
बाळापूर : पावसाचे पाणी भिंतीत मुरल्याने शहरातील सतरंजी पुरा भागात घराची भिंत कोसळून ढिगाऱ्याखाली दबल्याने नऊवर्षीय बालकाचा मृत्यू झाल्याची ...

बाळापूर येथे भिंत कोसळून नऊवर्षीय बालकाचा मृत्यू
बाळापूर : पावसाचे पाणी भिंतीत मुरल्याने शहरातील सतरंजी पुरा भागात घराची भिंत कोसळून ढिगाऱ्याखाली दबल्याने नऊवर्षीय बालकाचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी पहाटेच्या सुमारास घडली. या घटनेत घरातील आणखी पाच जण जखमी झाले आहेत.
बाळापूर शहरातील सतरंजीपुरा भागात शेख रसूल शेख वजीर (४२) यांचे विटा-मातीचे घर आहे. पावसामुळे मातीच्या भिंतीत पाणी मुरल्याने घराची भिंत कोसळली. घरामध्ये झोपलेले शेख रसूल शेख वजीर व त्यांची पत्नी शबाना परवीन, मुले शेख रुमान, शेख फरान, शेख इरफान व शेख कामरान शेख रसुल ढिगाऱ्याखाली दबले. घराची भिंत कोसळल्याची माहिती मिळताच साजिद इक्बाल अब्दुल रशीद यांच्यासह शेजाऱ्यांनी धाव घेऊन ढिगाऱ्याखाली दबलेल्यांना बाहेर काढले. या घटनेत नऊवर्षीय शेख कारान शेख रसूल याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या घटनेत घरातील आणखी पाच जण जखमी असून, त्यांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय बाळापूर येथे हलविण्यात आले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
------------------
घरातील साहित्याचे नुकसान
बाळापूर शहरात गत दोन दिवसांपासून जोरदार पाऊस होत आहे. पावसाचे पाणी भिंतीत मुरल्याने सतरंजीपुरा भागातील घराची भिंत कोसळली. या घटनेत घरातील साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पावसाच्या पाण्यात घरातील संसारोपयोगी साहित्यासह धान्य भिजले आहे.
(फोटो)