राष्ट्रवादी काँग्रेसने दिला ४८ जागांचा प्रस्ताव
By Admin | Updated: January 28, 2017 01:52 IST2017-01-28T01:50:11+5:302017-01-28T01:52:35+5:30
आघाडीच्या मुद्यावर मुंबईत काँग्रेस-राष्ट्रवादीची पहिली बैठक.

राष्ट्रवादी काँग्रेसने दिला ४८ जागांचा प्रस्ताव
अकोला, दि. २७- महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आघाडीसंदर्भात हालचालींनी वेग घेतला असून, शुक्रवारी मुंबईत पार पडलेल्या पहिल्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसने ४८ जागांचा प्रस्ताव काँग्रेसकडे सोपवल्याची माहिती आहे. राष्ट्रवादीचा प्रस्ताव पाहता काँग्रेसच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महापालिका निवडणुकीचा महासंग्राम सुरू झाला असून, विविध राजकीय पक्षांमधील अंतर्गत घडामोडींनी वेग घेतला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने मित्र पक्ष काँग्रेसमधील सहा व इतर पक्षातील चार, अशा एकूण दहा नगरसेवकांना गळाला लावत पक्षात प्रवेश मिळवून दिल्याने जिल्ह्याच्या वतरुळात राजकीय भूकंप आणला होता. मनपा निवडणुकीच्या अनुषंगाने शहरात राष्ट्रवादी काँग्रेसने मोर्चेबांधणीला जोरदार सुरुवात केल्यामुळे राजकीय समीकरणांमध्ये मोठय़ा प्रमाणात उलथापालथ होण्याची चिन्हं आहेत. सुरुवातीला काँग्रेससोबत आघाडी न करता महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढण्याचे संकेत राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विजय देशमुख यांनी दिले होते. यादरम्यान, राष्ट्रवादी व काँग्रेसची आघाडी व्हावी, यासाठी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांसह बाहेरील जिल्ह्यातील माजी आमदारांनी प्रयत्न सुरू ठेवले. बुधवारी (२५ जानेवारी) राकाँचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे अकोल्यात आले असता, त्यांनी सन्मानपूर्वक प्रस्ताव असल्यास समविचारी पक्षांसोबत आघाडीचे संकेत दिले होते. त्याच दिवशी सायंकाळी राकाँच्या स्थानिक नेत्यांनी मुंबईकडे कुच केले. आघाडीच्या मुद्यावर शुक्रवारी (२७ जानेवारी) विधान भवन येथे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकार्यांमध्ये सकाळी १0.३0 वाजता बैठक सुरू झाली. बैठकीत राष्ट्रवादीने काँग्रेससमोर सुरुवातीला ५२ जागांचा प्रस्ताव दिला होता, तर २८ जागा काँग्रेससाठी सोडण्याची तयारी दर्शवली होती. सायंकाळ होईपर्यंत एक पाऊल मागे सरकत राष्ट्रवादीने ४८ जागांचा प्रस्ताव काँग्रेसच्या पुढय़ात ठेवल्याची माहिती आहे.
राकाँच्यावतीने जिल्ह्याचे प्रभारी बसवराज पाटील, प्रदेश उपाध्यक्ष गुलाबराव गावंडे, जिल्हाध्यक्ष विजय देशमुख, महानगराध्यक्ष अजय तापडिया, सैयद युसूफ अली, विश्वनाथ कांबळे तसेच काँग्रेसकडून वजाहद मिर्झा, प्रदेश महासचिव मदन भरगड, शहर अध्यक्ष बबनराव चौधरी, माजी आ.नातिकोद्दीन खतीब,साजीद खान पठाण, मधुकर कांबळे, अब्दुल जब्बार, महेश गणगणे, कपील रावदेव, सरफराज खान आदी उपस्थित होते.
माणिकराव ठाकरे यांच्याकडे बैठक
राकाँ व काँग्रेसने एकमेकांसमोर सादर केलेल्या प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी शुक्रवारी रात्री विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे यांच्या दालनात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यासंदर्भात उद्या शनिवारी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण यांच्याकडे बैठक होईल. त्यानंतर पुन्हा दोन्ही पक्षांमध्ये जागा वाटपावर चर्चा केली जाईल.
यंदा राकाँ मोठय़ा भावाच्या भूमिकेत
काँग्रेससोबत जागा वाटपाच्या मुद्यावर नेहमीच तडजोड करणार्या राकाँने यंदा मात्र मोठय़ा भावाच्या भूमिकेत राहणे पसंत केल्याचे दिसते. २0१२ मधील निवडणुकीत ७३ जागांपैकी राष्ट्रवादीच्या वाटेला अवघ्या २७ जागा आल्या होत्या. यावेळी ४८ जागांवर लढण्याचे राकाँचे मनसुबे पुढील राजकीय वाटचाल स्पष्ट करतात.
राष्ट्रवादी काँग्रेसने ४८ जागांचा प्रस्ताव काँग्रेसकडे दिला आहे. आघाडीच्या मुद्यावर दोन्ही पक्षातील वरिष्ठ नेते व प्रमुख पदाधिकार्यांच्या उपस्थितीत सकारात्मक बैठक पार पडली. जागा वाटपाच्या संदर्भात लवकरच सोक्षमोक्ष लावल्या जाईल.
- विजय देशमुख,
जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस
दोन्ही पक्षांची चर्चा सकारात्मक झाली. काही प्रभागांबाबत वाद आहेत. राष्ट्रवादीने प्रस्ताव दिला आहे. तसाच काँग्रेसनेही प्रस्ताव दिला आहे. अंतिम निर्णय सर्व संमतीनेच होईल. सध्या केवळ चर्चा आहे.
- बबनराव चौधरी,
महानगर काँग्रेस अध्यक्ष