शेतक-यांच्या कर्जमुक्तीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक
By Admin | Updated: June 11, 2017 02:39 IST2017-06-11T02:39:22+5:302017-06-11T02:39:22+5:30
जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक; बळीराजाची सनद सादर.

शेतक-यांच्या कर्जमुक्तीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: शेतकरी शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणामुळे प्रचंड अडचणीत आला असून, कधी नव्हे एवढय़ा मोठय़ा प्रमाणात शेतमालाचे भाव पाडल्याने त्यांच्यावर आत्महत्येची वेळ आली आहे. या अडचणीतील शेतकर्यांना कर्जमुक्ती देण्यात यावी, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आक्रमक भूमिका घेत शनिवारी शेतकर्यांसह हजारो कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. शेतकर्यांची संपूर्ण कर्जमुक्ती होईपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस शांत बसणार नसल्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी राज्यमंत्री गुलाबराव गावंडे यांनी यावेळी दिला. सोबतच बळीराजाची सनद यावेळी अधिकार्यांना दिली. हे निवेदन मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले.
राज्यातील शेतकर्यांच्या कर्जमुक्तीचे आंदोलन दिवसेंदिवस तीव्र होत आहे. सत्ताधारी भाजप सरकार शेतकर्यांची कर्जमुक्ती न करता निव्वळ आश्वासनांच्या खैराती वाटत आहे. कोट्यवधी रुपयांचा निधी देण्यात आला, शेतकर्यांसाठी कामे करण्यात येत आहेत याच्या प्रचार प्रसिद्धीवरच भाजप सरकार उधळपट्टी करीत आहे; मात्र प्रत्यक्षात शेतकर्यांसाठी काहीही करण्यात येत नसल्याचे वास्तव आहे. त्यामुळे कर्जमुक्तीच्या मागणीवर राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष गुलाबराव गावंडे यांनी गत महिनाभरापासून जिल्ह्यातील गावोगावी फिरून कर्जमुक्ती आणि सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणांवर सडेतोड टीका करीत ग्रामीण भागात कर्जमुक्तीचे आंदोलन अधिक तीव्र केले आहे.