Nagpur's 'Review Committee' conducts survey of Akola GMC! | नागपूरच्या ‘समीक्षा समिती’ने केले अकोला जीएमसी’चे सर्वेक्षण!

नागपूरच्या ‘समीक्षा समिती’ने केले अकोला जीएमसी’चे सर्वेक्षण!

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : नागपूर येथील समीक्षा समितीने सोमवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वोपचार रुग्णालयाला भेट दिली. यावेळी समितीने रुग्णालयातील स्वच्छता तसेच कोरोनाबाधित रुग्णांना दिल्या जाणाऱ्या सुविधांची पाहणी केली. विशेष म्हणजे यावेळी समितीने प्रमुख्याने मनुष्यबळाचा आढावाही घेतला.
जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक झाला असताना संपूर्ण रुग्णसेवेचा भार एकट्या जीएमसीवर आला आहे. हा ताण कमी करण्यासाठी रुग्णालय प्रशासनाने शासनाकडे मनुष्यबळाची मागणी केली होती. नागपूर येथील समीक्षा समितीने सोमवारी अकोला जीएमसीला भेट देऊन रुग्णालयाचे सर्वेक्षण केले. यावेळी अधिष्ठाता डॉ. कुसुमाकर घोरपडे यांच्यासह नागपूर येथील समीक्षा समितीच्या सदस्यांची उपस्थिती होती. गत अनेक वर्षांपासून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय प्रशासन शासनाकडे मनुष्यबळाची मागणी करत आहे; मात्र आतापर्यंत शासनाने त्याकडे दुर्लक्ष केले होते. अशातच गत महिन्याभरात कोरोना आधी त्यांचा आकडा झपाट्याने वाढला आहे. वाढत्या रुग्णसंख्येचा संपूर्ण ताण सर्वोपचार रुग्णालयावर आला आहे. दरम्यान, मनुष्यबळाची कमी रुग्णालय प्रशासनासाठी डोकेदुखी ठरू लागली. त्यामुळे रुग्णालय प्रशासनाने पुन्हा एकदा शासनाकडे मनुष्यबळाची मागणी केल्याची माहिती आहे. या पृष्ठभूमीवर शासनाकडून नागपूर येथून एक समीक्षा समिती पाठविण्यात येणार असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली. ही समिती सर्वोपचार रुग्णालयाचा संपूर्ण आढावा घेणार असून, आवश्यक बदल आणि रुग्णांना चांगल्या सुविधा कशा पुरविण्यात येतील, यावर मंथन करणार आहे. शिवाय किती मनुष्यबळाची आवश्यकता आहे, यावरही प्रमुख्याने विचार केला जाणार असल्याची माहिती आहे. सर्वोपचार रुग्णालयाचा आढावा घेऊन ही समिती आपला अहवाल शासनाकडे पाठवणार आहे. त्यानंतर शासन काय निर्णय घेईल, याकडे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाचे लक्ष लागून आहे.


३० ते ३५ डॉक्टरांची मागणी
वैद्यकीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर घोरपडे यांनी शासनाकडे ३० ते ३५ डॉक्टरांची मागणी केली होती. त्या अनुषंगाने नागपूर येथील समीक्षा समितीने आढावा घेतला.


‘सुपर स्पेशालिटी’ची ही केली पाहणी
जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. ही संख्या अशीच वाढत राहिल्यास सर्वोपचार रुग्णालयात खाटांची संख्या वाढवावी लागणार आहे. त्यानुषंगाने पर्यायी जागा म्हणून सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलची पाहणी सोमवारी समीक्षा समितीद्वारे करण्यात आली.


सर्वेक्षणातील प्रमुख मुद्दे
 उपचार पद्धतीत आवश्यक असलेले बदल
 नवीन सुधारणा करता येथील का?
 रुग्णांना कशाप्रकारे चांगल्या सुविधा देता येतील?
सद्यस्थितीत किती मनुष्यबळाची आवश्यकता आहे?

 

Web Title: Nagpur's 'Review Committee' conducts survey of Akola GMC!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.