मूर्तिजापूर : एसटी बसच्या वाहकास लाखपुरी फाट्यावर मारहाण!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2018 21:27 IST2018-01-22T21:18:10+5:302018-01-22T21:27:58+5:30
मूर्तिजापूर : बसच्या खिडकीतून प्रवेश करणार्या विद्यार्थ्यास मज्जाव केल्याने तिघांनी वाहकास जबर मारहाण केल्याची घटना १९ जानेवारी रोजी दुपारी लाखपुरी फाट्यावर घडली. या प्रकरणी वाहकाच्या फिर्यादीवरून र्मतिजापूर ग्रामीण पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

मूर्तिजापूर : एसटी बसच्या वाहकास लाखपुरी फाट्यावर मारहाण!
लोकमत न्यूज नेटवर्क
मूर्तिजापूर : बसच्या खिडकीतून प्रवेश करणार्या विद्यार्थ्यास मज्जाव केल्याने तिघांनी वाहकास जबर मारहाण केल्याची घटना १९ जानेवारी रोजी दुपारी लाखपुरी फाट्यावर घडली. या प्रकरणी वाहकाच्या फिर्यादीवरून मूर्तिजापूर ग्रामीण पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
दर्यापूर आगाराची बस एम. एच ४0 एन ८0७५ ही बस मूर्तिजापूर येथून प्रवासी घेऊन निघाली असता, दर्यापूर येथे पोहोचली. प्रवाशांची गर्दी पाहता एका शाळकरी विद्यार्थ्याने जागा पकडण्यासाठी बसच्या खिडकीतून आतमध्ये शिरण्याचा प्रयत्न केला. त्याला वाहक सागर गावंडे यांनी हटकले असता त्याने वाद घातला. त्या विद्यार्थ्याने याची माहिती लाखपुरी येथील भावाला फोनवरून दिली. गाडी लाखपुरी फाट्यावर आली असता आधीच फाट्यावर १0 ते १५ लोक थांबलेले होते. बस थांबली असता जमावातील तिघांनी वाहक सागर गावंडे यांच्याबरोबर वाद घालून शिवीगाळ केली. तसेच बसमधील विद्यार्थ्याने बॅट वाहकाच्या छातीवर मारली. तसेच एकाने त्यांना लाथा बुक्कानी मारहाण केली. या झटापटीत वाहकाचा शर्ट फाटला आणि तिकीट मशीन खाली पडून पैसे ही पडले. मारहाण करणारा विद्यार्थी लाखपुरी येथेच राहतो. वाहक गावंडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून मूर्तिजापूर ग्रामीण पोलिसांनी विद्यार्थ्यासह तिघांविरुद्ध भादंवि कलम ३५३, ३३२, ५0४, ३४ नुसार गुन्हा दाखल केला आहे.. पुढील तपास सुरू आहे.