महापालिका निवडणूक : ठाकरेंच्या शिवसेनेचा मनसेला ८ जागांचा प्रस्ताव, लवकरच जागावाटप होणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2025 15:57 IST2025-12-19T15:55:27+5:302025-12-19T15:57:46+5:30
Akola Municipal Elections 2026 MNS Shiv Sena: महापालिका निवडणुकीसाठी जागावाटपाच्या चर्चा सुरू आहेत. महाविकास आघाडीत असलेल्या ठाकरेंच्या शिवसेनेची मनसेसोबतही चर्चा सुरू आहे.

महापालिका निवडणूक : ठाकरेंच्या शिवसेनेचा मनसेला ८ जागांचा प्रस्ताव, लवकरच जागावाटप होणार
अकोला महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) यांच्यात युती होणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. याबाबत दोन्ही पक्षांचे जिल्हाप्रमुख गोपाल दातकर (उद्धवसेना) आणि पंकज साबळे (मनसे) यांनी त्याला दुजोरा दिला आहे.
या युतीनुसार दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये लवकरच जागावाटपाबाबत चर्चा होणार असून, प्राथमिक स्तरावर उद्धवसेनेकडून मनसेला ८ जागा देण्याचा प्रस्ताव दिल्याची माहिती पुढे आली आहे.
युतीची औपचारिक रूपरेषा व जागावाटप अंतिम झाल्यानंतर संयुक्त प्रचाराची दिशा ठरवली जाणार आहे. शहरात उद्धवसेनेचे संघटन अस्तित्वात असले, तरी शहरप्रमुख व माजी नगरसेवक राजेश मिश्रा शिंदेसेनेत गेल्याने उद्धवसेनेला मोठा संघटनात्मक धक्का बसला आहे.
राजकीय समीकरणे बदलणार?
उद्धवसेना-मनसे युतीमुळे अकोला महापालिकेच्या राजकारणात नवी समीकरणे तयार होण्याची चिन्हे दिसत असून, त्यात महाविकास आघाडीतील काँग्रेस, शरद पवार गट हे पक्ष आणि वंचित बहुजन आघाडीसोबत आल्यास, आगामी निवडणूक अधिकच रंगतदार होणार असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
मनसेला युवकांची साथ
या पार्श्वभूमीवर मनसेसोबतची युती उद्धवसेनेसाठीही महत्त्वाची ठरणार आहे. अकोला शहरात मनसेचे संघटन तुलनेने कमकुवत असले, तरी युवकांची साथ ही मनसेची मोठी ताकद मानली जाते. यापूर्वी महापालिकेत मनसेचा एक-एक नगरसेवक निवडून आला होता; मात्र २०१७ च्या निवडणुकीत मनसेला एकही जागा मिळाली नव्हती. त्यामुळे उद्धवसेनेसह होणारी युती मनसेच्या कार्यकर्त्यांसाठी नवसंजीवनी ठरण्याची शक्यता आहे.