रेल्वेमध्ये मुलीचा विनयभंग; अकोल्याच्या व्यापा-यास अटक
By Admin | Updated: January 28, 2017 02:05 IST2017-01-28T02:05:23+5:302017-01-28T02:05:23+5:30
व्यापा-याची केली यथेच्छ धुलाई; जामिनावर झाली सुटका.

रेल्वेमध्ये मुलीचा विनयभंग; अकोल्याच्या व्यापा-यास अटक
शेगाव, दि. २७ मुंबईकडे जाणार्या विदर्भ एक्स्प्रेसमधील वातानुकूलित बोगीमध्ये अकोल्यातील ५१ वर्षीय व्यापार्याने १२ वर्षीय मुलीचा मद्यधुंद अवस्थेत विनयभंग केल्याची घटना २४ जानेवारीच्या रात्री अकोला-शेगाव दरम्यानच्या प्रवासात घडली. या प्रकरणात सदर व्यापार्याची यथेच्छ धुलाई करण्यात आली. यानंतर आरोपीविरुद्ध पास्को कायद्यासह विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले.
अमरावती येथील एक कपडा व्यावसायिक आपल्या १२ वर्षीय मुलीसह कुटुंबीयांसोबत हावडा मुंबई एक्स्प्रेसमधून ठाण्याला जाण्यासाठी प्रवास करीत होते. यावेळी अकोला येथून महेश सुरेश केडिया या बोगीमध्ये चढले. दरम्यान, शेगाव रेल्वेस्थानक क्रॉस झाल्यानंतर सदर इसमाने १२ वर्षीय मुलीला ईल इशारे करीत तिची छेडखानी केली. सदर प्रकार मुलीने आपल्या कुटुंबीयांना सांगितल्यानंतर कुटुंबीयांसह प्रवाशांनी मद्यधुंद असलेल्या महेश केडिया या इसमाला चोप दिला. रात्री ११ च्या सुमारास विदर्भ एक्स्प्रेस भुसावळ रेल्वेस्थानकावर पोहोचताच पोलिसांनी आरोपी केडिया याला गाडीतून ताब्यात घेतले. सदर प्रकरणी मुलीच्या वडिलांनी आरोपी दिलेल्या तक्रारीवरून कलम ३५४ (अ), ५0९ भादंविसह मुंबई दारूबंदी कायदा कलम ८५ (१), आणि बाल लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम २0१२ अन्वये कलम ८ आणि १२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. सदर घटना ही शेगाव रेल्वे पोलिसांच्या हद्दीत घडल्याने आरोपीला शेगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. शेगाव पोलिसांनी आरोपीला २५ जानेवारी रोजी खामगावच्या सत्र न्यायालयासमोर हजार केले असता, आरोपीची जामिनावर सुटका करण्यात आली.