शिंदेंच्या चार नगरसेवकांचे सदस्यत्व धोक्यात? उद्धवसेनेकडून अपात्र ठरवण्याची याचिका दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2026 17:56 IST2026-03-26T17:55:54+5:302026-03-26T17:56:43+5:30
चार नगरसेवकांविरोधात अपात्रतेची याचिका विभागीय आयुक्तांकडे दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

शिंदेंच्या चार नगरसेवकांचे सदस्यत्व धोक्यात? उद्धवसेनेकडून अपात्र ठरवण्याची याचिका दाखल
अकोला महापालिकेत उद्धवसेनेतील फूट अधिक तीव्र होत असून, चार नगरसेवकांच्या शिंदेसेनेतील प्रवेशानंतर आता अपात्रतेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. उद्धवसेनेचे गटनेते विजय इंगळे यांनी संबंधित नगरसेवकांना अपात्र ठरवण्याची याचिका विभागीय आयुक्तांकडे सादर केली आहे. मंगळवारी शिंदेसेनेत गेलेल्या चारही नगरसेवकांनी बैठक घेत, नगरसेवक सागर भारूका यांची गटनेतेपदी निवड केली आहे.
मनपा निवडणुकीत उद्धवसेनेतून मनोज पाटील, सोनाली सरोदे, सागर सुभाषचंद्र भारुका, सुरेखा मंगेश काळे, अभय खुमकर आणि विजय इंगळे हे सहा नगरसेवक निवडून आले होते. मात्र, गत आठवड्यात मनोज पाटील, सोनाली सरोदे, सागर भारुका आणि सुरेखा काळे या चौघांनी शिंदेसेनेत प्रवेश केला. यासोबतच जिल्हाप्रमुख मंगेश काळे यांनीही शिंदेसेनेत प्रवेश केला. यानंतर या चार नगरसेवकांनी उर्वरित नगरसेवकांना बैठक बोलावून गटनेतेपदावर बदल करत सागर भारुका यांची नवीन गटनेतेपदी निवड केली.
दरम्यान, या निवडीला आव्हान देत विजय इंगळे यांनी विभागीय आयुक्तांकडे धाव घेतली असून, पक्षांतर विरोधी कायद्या अंतर्गत संबंधित नगरसेवकांना अपात्र ठरवण्याची मागणी केली आहे.
त्यांच्या मते, पक्षाच्या अधिकृत व्हीपनुसारच गटनेते निवडले जातात आणि ती प्रक्रिया आधीच पूर्ण झाली होती. या प्रकरणामुळे आता शिवसेनेच्या दोन्ही गटांमध्ये कायदेशीर लढाई रंगण्याची शक्यता असून, गटनेतेपदासह नगरसेवकांच्या सदस्यत्वावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.