गुढीपाडव्याला झेंडूने केली निराशा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 04:17 AM2021-04-14T04:17:28+5:302021-04-14T04:17:28+5:30

संतोषकुमार गवई पातूर : लॉकडाऊनची टांगती तलवार, अपेक्षित भाव नाही आणि कोरोनाच्या सावटामुळे तालुक्यातील स्थानिक शेतकऱ्यांनी यंदा झेंडू शेतीकडे ...

Marigold disappoints Gudipadva! | गुढीपाडव्याला झेंडूने केली निराशा!

गुढीपाडव्याला झेंडूने केली निराशा!

Next

संतोषकुमार गवई

पातूर : लॉकडाऊनची टांगती तलवार, अपेक्षित भाव नाही आणि कोरोनाच्या सावटामुळे तालुक्यातील स्थानिक शेतकऱ्यांनी यंदा झेंडू शेतीकडे पाठ फिरवल्याचे दिसते. जवळपास ३० ते ४० टक्के क्षेत्र घटले असण्याची शक्यता वर्तविली आहे. तसेच यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कडक निर्बंध असल्याने गुढीपाडव्याला झेंडूने निराशा केली आहे.

मागील वर्षी गुढीपाडव्याला झेंडूचे चांगले उत्पादन काढले होते. मात्र, त्याच वेळी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने सरकारने लॉकडाऊनची घोषणा केली होती. यामध्ये सर्व व्यवसाय ठप्प झाल्याने झेंडू उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. यंदाही गुढीपाडव्याला अशी परिस्थिती उद‌्भवू शकेल, या भीतीने अनेक झेंडू उत्पादक शेतकऱ्यांनी झेंडूची शेतीच केली नसल्याचे चित्र आहे. कोरोनामुळे मागील वर्षी झेंडू फुकट गेला असून, यंदा कोरोनाची स्थिती ‘जैसे थे’च आहे. परिणामी तालुक्यात सर्वाधिक फुलशेती करणाऱ्या शेतकऱ्यांनी यंदा झेंडूची लागवड कमी केली आहे. कोरोनाचे वाढते सावट आणि मालाला कमी किंमत यामुळे अनेकांनी झेंडू शेतीकडे पाठ फिरवल्याचे चित्र सांगितले.

कोट

मागील वर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव व परतीच्या पावसामुळे फुलशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. विक्रीची हमी आणि बाजार उपलब्ध नसल्यामुळे शेतकऱ्यांनी फुलशेतीकडे पाठ फिरविली आहे.

- उमेश फुलारी, फूल उत्पादक शेतकरी, पातूर

मंदिरे बंद असल्याचाही परिणाम

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने लॉकडाऊन घोषित केला. यामध्ये मंदिरे, देवस्थाने बंद करण्यात आली. परिणामी हार, फुलांची मागणी घटल्याने शेतकऱ्यांना अडचणीचा सामना करावा लागला. यंदाही मिनी लॉकडाऊनमुळे गुढीपाडव्याच्या दिवशी फुलांना भाव नसल्याचे दिसून आले. फूल उत्पादक शेतकऱ्यांना शासनाने मदत करण्याची मागणी होत आहे.

Web Title: Marigold disappoints Gudipadva!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.