'Marathi Vachan Katta' on social media! | सोशल मीडियावर 'मराठी वाचन कट्टा' !

सोशल मीडियावर 'मराठी वाचन कट्टा' !

वाशिम: यंदा कोरोनामुळे ‘वाचन प्रेरणा दिन’ही आॅनलाईन पद्धतीने साजरा केला जाणार असून, वाचन संस्कृती जोपासण्यासाठी शैक्षणिक व अन्य संस्थांनी सोशल मीडियावर ‘मराठी वाचन कट्टा' निर्माण करावा, अशा सूचना मराठी भाषा विभागाने १४ सप्टेंबरला दिल्या.
माजी राष्ट्रपती स्व. डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या स्मृती जतन करण्याच्या उद्देशाने १५ आॅक्टोबर हा त्यांचा जन्मदिवस ‘वाचन प्रेरणा दिन’ म्हणून दरवर्षी साजरा करण्यात येतो. यंदा कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव असल्याने सार्वजनिक कार्यक्रमांवर मर्यादा आल्या असून, सावधगिरीचा प्रयत्न म्हणून आॅनलाईन पद्धतीने कार्यक्रम, चर्चासत्रे व अन्य उपक्रम घेण्याच्या सूचना मराठी भाषा विभागाने १४ सप्टेंबर रोजी दिल्या. मराठी वाचन संस्कृती जपण्यासाठी सर्वांनी डिजिटल माध्यमाचा जास्तीत जास्त वापर करून मराठीतील साहित्य स्वयंस्फुर्तीने वाचकांना पाठवावे तसेच सर्व संस्थांनी, शाळांनी सोशल मीडियावर ‘मराठी वाचन कट्टा’ निर्मिती करावी, अशा सूचना देण्यात आल्या. वाचन संस्कृती जोपासण्यासाठी सर्वांनी मित्र, कुटुंबातील सदस्य आदींना किमान एक पुस्तक पिडीएफ स्वरुपात आॅनलाईन पद्धतीने पाठवून त्यांना वाचनास प्रोत्साहन द्यावे, सोशल मीडियाच्या माध्यमातून वाचन संस्कृती वृद्धींगत होईल, वाचनास प्ररेणा मिळेल असे संदेश प्रसारीत करावे, अशी अपेक्षाही मराठी भाषा विभागाने व्यक्त केली.

Web Title: 'Marathi Vachan Katta' on social media!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.