बिबट्याची कातडी जप्त; तिघांना घेतले ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2025 06:48 IST2025-01-28T06:46:07+5:302025-01-28T06:48:07+5:30
केंद्रीय महसूल गुप्तचर संचालनालयाच्या पुणे येथील पथकाची कारवाई

बिबट्याची कातडी जप्त; तिघांना घेतले ताब्यात
अकोला : बिबट्याच्या कातडीची तस्करी करणाऱ्या तीन आरोपींना अकोट तालुक्यातील जंगलात केंद्रीय महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय) पुणे येथील पथकाने अटक केली आहे. त्यांच्याकडून बिबट्याची कातडी जप्त करण्यात आली असून, आरोपींना अकोट व अकोला वनविभागाकडे पुढील तपासासाठी सोपविले आहे.
मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे, अकोट, अकोला जिल्ह्यातील काही व्यक्ती बिबट्याच्या कातडीची तस्करी करण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती डीआरआयच्या पुणे येथील पथकाला मिळाली होती. त्यानुसार डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी लक्ष ठेवून कारवाई केली आणि अकोटच्या जंगलात पाठलाग करून तीन आरोपींना बिबट्याच्या कातडीसह अटक केली. वन्यजीव संरक्षण अधिनियम, १९७२ नुसार वन्य प्राण्यांची शिकार करून कातडी व वन्य प्राण्यांचे कोणतेही अंगाची तस्करी करणे गुन्हा आहे. बिबट्या हा अधिनियमाच्या अनुसूची-१ मध्ये समाविष्ट असून, बिबट्याच्या कातडीचा व्यापार, खरेदी-विक्री किंवा मालकी बाळगणे कठोरपणे प्रतिबंधित आहे.
बिबट्याचे कातडे जप्त
पुणे येथील डीआरआयच्या पथाने केलेल्या या कारवाईत तीन व्यक्तींना पकडण्यात आले. त्यात दोन वाहक आणि एका मध्यस्थाचा समावेश आहे. त्यांच्याकडून ८०.५ इंच बाय २५ इंच आकाराचे एक बिबट्याचे कातडे जप्त करण्यात आले. वन्यजीव संरक्षण अधिनियम, १९७२ अंतर्गत ही कारवाई करण्यात आली. जप्त करण्यात आलेली कातडी आणि अटक करण्यात आलेले तीन आरोपी पुढील तपासासाठी अकोला जिल्हा वनविभागाकडे सुपूर्द करण्यात आले आहेत.
तस्करांवर कारवाई करणारा विभाग
केंद्रीय महसूल गुप्तचर संचालनालय हे केंद्र सरकारच्या राज्यस्व विभागांतर्गत काम करते. जीएसटी विभागासोबत समन्वय ठेवून काम करणाऱ्या केंद्रीय महसूल गुप्तचर संचालनालयाच्या पुणे येथील पथकाला वन्यजीवाच्या कातडीची तस्करी केली जात असल्याची माहिती मिळाली. त्या आधारे ही कारवाई अकोला जिल्ह्यात करण्यात आली असल्याची माहिती विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.