पाणीटंचाईने होरपळले ‘लक्ष्मी’चे आयुष्य; विहिरीत पडल्याने देतेय मृत्यूशी झुंज!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2018 23:43 IST2018-01-10T23:35:47+5:302018-01-10T23:43:09+5:30
अकोला : भीषण पाणीटंचाईमुळे शाळेत जाण्याच्या वयातच विहिरीवर पाणी भरण्याची जबाबदारी येऊन पडलेली मानोरा तालुक्यातील मोहगव्हाण येथील १३ वर्षीय लक्ष्मी नारायण ठाकरे ३0 फूट विहिरीत कोसळली. तिच्या डोक्याला गंभीर इजा झाल्याने अकोला येथील खासगी रुग्णालयात शस्त्रक्रिया करावी लागणार आहे. घरची परिस्थिती हलाखीची असल्याने तिचे आई-वडील आर्थिक मदतीसाठी वणवण भटकत आहेत.

पाणीटंचाईने होरपळले ‘लक्ष्मी’चे आयुष्य; विहिरीत पडल्याने देतेय मृत्यूशी झुंज!
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : भीषण पाणीटंचाईमुळे शाळेत जाण्याच्या वयातच विहिरीवर पाणी भरण्याची जबाबदारी येऊन पडलेली मानोरा तालुक्यातील मोहगव्हाण येथील १३ वर्षीय लक्ष्मी नारायण ठाकरे ३0 फूट विहिरीत कोसळली. तिच्या डोक्याला गंभीर इजा झाल्याने अकोला येथील खासगी रुग्णालयात शस्त्रक्रिया करावी लागणार आहे. घरची परिस्थिती हलाखीची असल्याने तिचे आई-वडील आर्थिक मदतीसाठी वणवण भटकत आहेत.
मानोरा तालुक्यातील मोहगव्हाण येथे भीषण पाणीटंचाई आहे. गावात एकच सार्वजनिक विहीर असून, या विहिरीत शेतातील एका विहिरीतून पाइपद्वारे पाणी सोडण्यात येते. गत तीन दिवसांपासून गावात विद्युत पुरवठाच नसल्याने गावकर्यांना पाण्यापासून वंचित राहावे लागले. रविवारी विद्युत पुरवठा सुरू झाल्यानंतर विहिरीत पाणी सोडण्यात आले. त्यामुळे विहिरीवर गावकर्यांची एकच झुंबड उडाली. सहाव्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या लक्ष्मीचे वडील नारायण ठाकरे हे मजुरीसाठी कामावर गेले होते. त्यामुळे पाणी भरण्याची जबाबदारी लक्ष्मीवर आली. लक्ष्मी अन्य मुलींसोबत विहिरीवर पाणी भरण्यासाठी गेली. विहिरीमध्ये एका कोपर्यात थोडे पाणी होते. पाणी बाहेर काढणे सोपे नव्हते. पाणी बाहेर काढण्याचा प्रयत्न करीत असताना लक्ष्मी ३0 फूट खोल विहिरीत कोसळली. विहिरीमध्ये खडक असल्याने तिच्या डोक्याला व हाताला गंभीर दुखापत झाली. नागरिकांनी विहिरीमध्ये उतरून लक्ष्मीला बाहेर काढले. तोपर्यंत डोके व हातातून बराच रक्तस्राव झाला होता. लक्ष्मीला मानोरा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. डोक्याला व गंभीर दुखापत असल्याने डॉक्टरांनी तीला अकोल्याला हलविले. लक्ष्मीच्या घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. वडील मोलमजुरी करतात. दोन मुली व एका मुलाच्या शिक्षणाचा व पालन पोषणाचा खर्चही त्यांना पेलवत नाही. सध्या लक्ष्मीवर अकोला येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तिच्या डोक्यावर शस्त्रक्रिया करावी लागणार असून, त्याकरिता ४0 हजार रुपयांची गरज आहे. त्याकरिता लक्ष्मीचे आई-वडील पैशांसाठी वणवण भटकत आहेत. गावकरी व शाळेतील विद्यार्थ्यांनी मदत दिली. मात्र, लक्ष्मीला आणखी मदतीची गरज आहे.
गावकरी व शाळेतील विद्यार्थ्यांनी दिली मदत
लक्ष्मीच्या घरातील आर्थिक परिस्थितीची जाणीव तिच्या शाळेतील शिक्षकांना आहे. त्यामुळे तिच्या उपचारासाठी शाळेतील शिक्षक व विद्यार्थ्यांनी पाच हजार रुपयांची मदत केली. त्यानंतर गावातील तरुणांनी गावात लोकवर्गणी करून १२ हजार रुपयांची मदत दिली आहे. तसेच आणखी गावात वर्गणी करण्यात येत आहे.