लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : देशाची राजधानी दिल्लीतील ऐतिहासिक लाल किल्ल्याजवळील मेट्रो स्टेशनसमोरील कारमध्ये झालेल्या भीषण बॉम्बस्फोटानंतर या प्रकरणात अकोल्यातील पिंजर पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका युवकावर संशय व्यक्त करण्यात आला आहे. या संशयाच्या आधारे पोलिस अधीक्षक अर्चित चांडक यांनी संबंधित युवकाला ताब्यात घेऊन सुमारे दहा तासांहून अधिक वेळ कसून चौकशी केल्याची माहिती खात्रीलायक सुत्रांनी दिली.
पोलिसांनी सांगितले की, पिंजर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका गावातील हा युवक घातपाती कारवायांमध्ये सहभागी असू शकतो, या संशयावरून अकोला पोलिस अनेक दिवसांपासून त्याच्या हालचालींवर गुप्तपणे नजर ठेवून होते. दरम्यान, १० नोव्हेंबर रोजी झालेल्या स्फोटाच्या काळात हा युवक अचानक अकोला जिल्ह्यातून बेपत्ता झाला. त्याच दिवशी त्याचे मोबाइल लोकेशन दिल्लीत असल्याचे आढळल्याने पोलिसांचा संशय अधिक बळावला.
१० नोव्हेंबरच्या रात्रीपासून पोलिस अधीक्षक चांडक स्वतः विविध माध्यमांचा वापर करून या युवकाचा शोध घेत होते. गुप्त माहितीच्या आधारे त्याला ताब्यात घेऊन सुरक्षित ठिकाणी चौकशी करण्यात आली. या युवकाबाबतची सर्व माहिती, पार्श्वभूमी, तसेच त्याची कुंडली पोलिसांकडून गोळा केली जात आहे. स्फोटाच्या वेळी तो दिल्लीत उपस्थित असल्याने त्याचे मोबाइल लोकेशन, कॉल डेटा रेकॉर्ड, तसेच डिजिटल माध्यमातील सर्व संबंधित माहिती तपासण्यात येत आहे.
स्फोटाच्या वेळी युवक दिल्लीमध्येच
बार्शीटाकळी तालुक्यातील हा युवक स्फोटाच्या दोन दिवस आधी अकोल्यातून बेपत्ता झाला होता आणि स्फोटाच्या वेळी दिल्लीमध्ये असल्याचे आढळले. पोलिसांनी त्याच्या हालचालींवर आधीपासूनच पाळत ठेवली असताना तो अचानक गायब झाला आणि त्याच वेळी दिल्लीत असल्याचे उघड झाल्याने संशय अधिक गडद झाला. त्यामुळे तातडीने शोध घेऊन त्याला चौकशीसाठी आणले.
"दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात एका युवकास ताब्यात घेऊन कसून चौकशी करण्यात येत आहे. स्फोटाच्या रात्रीपासूनच पोलिस त्याच्या मागावर होते. स्फोटावेळी तो दिल्लीत असल्याचे आढळल्याने तपासाला अधिक गती देण्यात आली आहे. कॉल डेटा आणि इतरही तांत्रिक माध्यमांतून माहिती गोळा करण्यात येत आहे."- अर्चित चांडक, पोलिस अधीक्षक, अकोला
Web Summary : Akola youth is under suspicion after a Delhi blast due to location data. Police questioned him extensively. He was missing from Akola during the blast and his mobile location placed him in Delhi, intensifying suspicions. Police are analyzing his call records and digital footprints.
Web Summary : दिल्ली में विस्फोट के बाद अकोला का एक युवक संदेह के घेरे में है। पुलिस ने उससे पूछताछ की क्योंकि विस्फोट के दौरान वह अकोला से गायब था और उसका मोबाइल लोकेशन दिल्ली में पाया गया। पुलिस कॉल रिकॉर्ड और अन्य डिजिटल जानकारी की जांच कर रही है।