अकोला : जिल्ह्यासह ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत चालला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. उपविभागीय अधिकारी तथा नोडल अधिकारी कोविड-१९ डॉ. नीलेश अपार यांचे पत्र सरपंचांना मिळाले असून, यामध्ये गावात विनापरवानगी जमाव किंवा परवानगीपेक्षा जास्त गर्दी झाल्याचे आढळून आल्यास संबंधित सरंपचांवर कारवाई करण्याची नोटीस मिळाल्याने सरपंचांमध्ये नाराजीचा सूर उमटत असून, हिंगणी बु. येथील सरपंच कल्पना अशोक पळसपगार यांनी याचा निषेध करीत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. कोरोनाच्या संकट काळात सरपंचांना प्रोहोत्सन व मदतीचा हात देण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
हिंगणी बु. येथील सरपंच कल्पना अशोक पळसपगार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनानुसार, ग्रामीण भागात नोकरीवर कार्यरत असलेल्या ग्रा.पं.चे ग्रामसेवक, तलाठी, जिल्हा परिषद शिक्षक भरघोस पगार घेतात. मात्र, गावात नेहमी अनुपस्थित असतात. तसेच शासकीय कर्मचारी रेजेवर जातात तेव्हा त्यांच्यावर कारवाई केल्या जात नाही, असा प्रश्न सरपंच पळसपगार यांनी निवेदनातून उपस्थित केला आहे. सरपंच गावातील अनेक जबाबदाऱ्या संभाळतो, वेळवर न मिळणाऱ्या मानधानावर अहोरात्र काम करतो. कोरोनाच्या संकट काळात शासनाकडून मदतीचा हात मिळणे आवश्यक आहे. कारवाईची धमकी देणारी नोटीस नको, अशी मागणी पळसपगार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
-----------------------
लॉकडाऊनपूर्वी मी स्वत: खर्च करून ग्रामपंचायतींतर्गत येणाऱ्या तीनही गावांत सॅनिटायझेशन केले. तेव्हा ग्रामसेवक दोन महिन्यांसाठी रजेवर होते. त्यांच्यावर कुठलीही कारवाई झाली नाही. सरपंचांवर कारवाई करण्यापेक्षा शासनाकडून मदतीच्या हाताची गरज आहे.
- कल्पना अशोक पळसपगार, सरपंच, हिंगणी बु., ता.जि. अकोला.