अकोला जिल्ह्याला अतिवृष्टीचा तडाखा; २८ मंडळांमध्ये संततधार; ४७ घरांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2018 17:59 IST2018-08-17T17:56:03+5:302018-08-17T17:59:20+5:30
अकोला : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे नदी, नाल्यांना पूर आला आहे. जिल्ह्यातील २८ मंडळांना अतिवृष्टीचा तडाखा बसला असून, हजारो हेक्टरवरील पिके पाण्यात गेली आहेत.

अकोला जिल्ह्याला अतिवृष्टीचा तडाखा; २८ मंडळांमध्ये संततधार; ४७ घरांचे नुकसान
अकोला : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे नदी, नाल्यांना पूर आला आहे. जिल्ह्यातील २८ मंडळांना अतिवृष्टीचा तडाखा बसला असून, हजारो हेक्टरवरील पिके पाण्यात गेली आहेत. पुलावरून पाणी असल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला असून, अतिवृष्टीमुळे ४७ घरांचे नुकसान झाले आहे.
महिनाभराच्या खंडानंतर जिल्ह्यात १६ ते १७ आॅगस्ट दरम्यान अकोला तालुक्यातील कापशी मंडळात १०९, सांगळुद ११०, शिवणी १०२, बोरगाव मंजू १०५, पळसो १०५, कुरणखेड १२० मिमी पावसाची नोंद झाली आहे. बार्शीटाकळी तालुक्यात बार्शीटाकळी मंडळात १९४ मिमी, राजंदा १८०, महान १४०, पिंजर १४५, धाबा १५२, खेर्डा बु. १४१ मिमी पावसाची नोंद झाली आहे. तेल्हारा तालुक्यात पाथर्डी मंडळात ६८ मिमी, बाळापूर तालुक्यात निंबा मंडळात ११९, पारस मंडळात ७०, व्याळा ६६, पातूर तालुक्यात पातूर मंडळ १०८, आलेगाव ११३, बाभूळगाव ९१, चान्नी ९०, सस्ती ११४ मिमी पावसाची नोंद झाली आहे. मूर्तिजापूर मंडळात १२२, माना ८५, कुरूम ९०, निंभा १४०, लाखपुरी ८९, हातगाव ८५, शेलू बाजार ८४ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
अकोला तालुक्यात सर्वाधिक घरांचे नुकसान
संततधार पावसामुळे अकोला तालुक्यातील ३० घरांचे नुकसान झाले आहे, तर बार्शीटाकळीत एक, तेल्हाऱ्यात एक, बाळापुरात तीन आणि मूर्तिजापुरात १२ घरांचे नुकसान झाले आहे. मूर्तिजापूर तालुक्यात तीन जनावरांचा मृत्यू झाला आहे.
या नद्यांना आला पूर
संततधार पावसामुळे जिल्ह्यातील मोर्णा, काटेपूर्णा, पूर्णा, कमळगंगा, उमा या नद्यांना पूर आला आहे. या नद्यांचे पाणी शेतात शिरल्याने हजारो हेक्टवरील पिके पाण्यात गेली आहेत.
या गावांचा तुटला संपर्क!
नद्यांना पूर येऊन पुलावरून पाणी असल्याने जिल्ह्यातील बोरगाव वैराळे, आगर, दुधाळा, सांगवी बाजार व सांगवी बु. या गावांचा संपर्क तुटला आहे.
मूर्तिजापूर-म्हैसांग-अकोला मार्ग व मूर्तिजापूर दहीगाव अकोला मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. अकोला-हातरुण-बोरगाव वैराळे रस्त्यावर मोर्णा नदीच्या पुलावर पुराचे पाणी आल्याने बोरगाव वैराळे गावाकडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाली होती. अकोला ते आगर मार्गही बंद होता.