घरी पोहोचण्यापूर्वीच त्याला मृत्यूने गाठले;अज्ञात वाहनाच्या धडकेत परप्रांतीय मजुर ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2020 17:24 IST2020-05-09T17:21:14+5:302020-05-09T17:24:51+5:30
मजुराचा जागेवरच मृत्यू झाला तर त्याची सहा वर्षीय मुलगी आणि एक नातेवाईक गंभीर जखमी झाले.

घरी पोहोचण्यापूर्वीच त्याला मृत्यूने गाठले;अज्ञात वाहनाच्या धडकेत परप्रांतीय मजुर ठार
बाळापूर : घरी जाण्यासाठी मुंबईतून गावाकडे दुचाकीने निघालेल्या उत्तर प्रदेशातील मजुरास मृत्यूने गाठले. बाळापूरजवळ अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत या मजुराचा जागेवरच मृत्यू झाला तर त्याची सहा वर्षीय मुलगी आणि एक नातेवाईक गंभीर जखमी झाले. ही घटना ९ मे रोजी बाळापूर शहराजवळ घडली. कमला शंकर यादव(३२) रा.जौनपूर उत्तर प्रदेश असे मृताचे नाव आहे.
लॉकडाउन वाढल्याने अनेक परप्रांतीय मजूर मुंबईसह इतर शहरांमध्ये अडकले आहेत. या मजुरांना राज्यात पाठविण्यासाठी केंद्र सरकारने परवानगी दिली असली तरी अनेक मजुरांचा संयम सुटल्याने मिळेल त्या वाहनाने, तसेच दुचाकी, सायकल किंवा पायी गावाकडे जात आहेत. उत्तर प्रदेशातील जौनपूर येथील कमला शंकर यादव व त्याची सहा वर्षीय मुलगी मोनाली यादव व नातेवाईक सुजीत यादव यांच्यासह दुचाकी क्र.एमएच ०४ सीएक्स ४८३ ने गावाकडे निघाला होता. शनिवारी पहाटे राष्ट्रीय महामार्गावर बाळापूरजवळ अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीस धडक दिली. यामध्ये कमला यादव यांचा घटनास्थळावरच मृत्यू झाला तर सहा वर्षीय मुलगी व नातेवाईक गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच बाळापूर पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेऊन जखमींना ग्रामीण रुग्णालयात दाखल केले, तसेच अपघाताची माहिती नागपूर व मुंबई येथील नियंत्रण कक्षाला देण्यात आली आहे. पुढील तपास बाळापूर पोलीस करीत आहेत. (शहर प्रतिनिधी)