नातवाच्या सुटकेसाठी न्यायालयाच्या आवारातच आजीने केला जादूटोणा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2019 06:41 IST2019-10-16T06:40:31+5:302019-10-16T06:41:01+5:30

मूर्तिजापूर पोलिसांत गुन्हा दाखल : सुगंधी मोहरी टाकून केले मंत्रतंत्र

Grandma did magic in the court premises to relieve their grandchildren | नातवाच्या सुटकेसाठी न्यायालयाच्या आवारातच आजीने केला जादूटोणा!

नातवाच्या सुटकेसाठी न्यायालयाच्या आवारातच आजीने केला जादूटोणा!

अकोला : मूर्तिजापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विनयभंग, तसेच पोक्सो कायद्यात आरोपी असलेल्या युवकाच्या सुटकेसाठी त्याच्या आजीने जिल्हा व सत्र न्यायाधीश यांच्या न्यायालयाच्या आवारात सुगंधी मोहरी टाकून मंत्रतंत्र केले आणि त्यानंतर जादूटोणा केल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवारी घडला. या प्रकरणाचा तपास करून रामदास पेठ पोलिसांनी मंगळवारी या महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.


अल्पवयीन मुलीशी अश्लील चाळे करणाऱ्या समीर शाह सलीम शाह या युवकाला मूर्तिजापूर पोलिसांनी विनयभंग, तसेच पोक्सो कायद्याच्या विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करून अटक केली.
आरोपीला न्यायालयासमोर हजर करून न्यायालयाच्या आदेशाने कारागृहात रवानगी केली. त्यानंतर जामिनासाठी नातेवाइकांनी न्यायालयात धाव घेतली. मात्र, जामीन मिळाला नाही. त्यानंतर, शुक्रवारी आरोपीची आजी व आणखी एक अशा दोन बुरखाधारी महिला न्यायालयात आल्या.
तिथे आजी जरीनाबी नरसुल्ला शाह (४८, रा. अकोट फैल) हिने नातवाच्या सुटकेसाठी न्यायालयाच्या कक्षासमोरच सुगंधीत पिवळसर आणि पांढरी मोहरी टाकून जोरात मंत्रतंत्र केले. हा प्रकार न्यायालयात उपस्थित असलेल्या काही कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी न्यायाधीशांना याची माहिती दिली. त्यानंतर, जिल्हा सत्र न्यायालयाचे प्रभारी अधीक्षक दिनेश जनार्दन अलकरी यांनी रामदास पेठ पोलीस ठाण्यात तक्र्रार दिली. त्यानंतर, पोलिसांनी लगेच गुन्हा दाखल केला.


अघोरी प्रथाबंदी कायद्याचा वापर
पोलिसांनी तपास करून जरीनाबी शाह यांच्याविरुद्ध महाराष्ट्र नरबळी जादूटोणा प्रतिबंध व अघोरी प्रथा उच्चारण अधिनियम २०१३च्या कलम ३ (२) अन्वये गुन्हा दाखल केला.

Web Title: Grandma did magic in the court premises to relieve their grandchildren