अकोला : भाजपाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा केंद्रीय ग्राम विकास मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या अपघाती निधनामुळे संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला. त्यांच्या निधनानंतर भाजप-शिवसेना व इतर संघटनांच्यावतीने अकोला बंदची हाक देण्यात आली होती. बुधवारी शहराच्या काही भागातील बाजारपेठ बंद ठेवून गोपीनाथ मुंडे यांना नागरिकांच्यावतीने आदरांजली वाहण्यात आली. या दरम्यान, शहरात कोठेही अनुचित प्रकार घडला नाही.नुकतीच केंद्रीय ग्रामविकास मंत्रीपदाची शपथ घेणारे भाजपा नेते गोपीनाथ मुंडे यांच्यावर अचानक काळाने घाला घातला. दिल्ली येथे ३ जून रोजी विमानतळावर जाण्यासाठी निघालेल्या मुंडे यांच्या वाहनाला इंडिका कारने धडक दिली. या घटनेत मुंडे यांचा मृत्यू झाल्याची वार्ता वार्यासारखी पसरताच, त्यांच्या चाहत्यांनी मिळेल त्या वाहनाने मुंबई व बुधवारी मुंडे यांचे गाव परळी गाठले. त्या पृष्ठभूमीवर भाजप-शिवसेनेच्यावतीने शहर बंदची हाक देण्यात आली होती. बुधवारी सकाळपासूनच बाजारपेठमधील काही भागात दुकाने बंद ठेवण्यात आली. व्यापार्यांसह नागरिकांनी या बंदला संमिश्र प्रतिसाद देत, गोपीनाथ मुंडे यांना आदरांजली वाहली.
गोपीनाथ मुंडे यांना अकोलेकरांची आदरांजली
By admin | Updated: June 5, 2014 00:23 IST