पतीसह कॅनडाला निघालेली प्रेयसी प्रियकरासह पळाली; दोघांनाही अकोल्यातून घेतले ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2025 09:41 IST2025-01-03T09:40:42+5:302025-01-03T09:41:31+5:30
दोघेही अकोला येथे एका लॉजमध्ये असताना दिल्ली पोलिसांनी बुधवारी दोघांना ताब्यात घेतले.

प्रतिकात्मक फोटो
अकोला : हरयाणा येथील रहिवासी असलेले पती-पत्नी दिल्ली विमानतळावरून कॅनडाला जाण्याच्या तयारीत असतानाच पत्नीने प्रियकराला बोलावून दिल्ली विमानतळावरून पळ काढला. दोघेही अकोला येथे एका लॉजमध्ये असताना दिल्ली पोलिसांनी बुधवारी दोघांना ताब्यात घेतले.
हरयाणा येथील एक दाम्पत्य नोकरीनिमित्त कॅनडा येथे जाण्यासाठी दिल्ली विमानतळावर आले होते. पत्नीला कॅनडाला जायचे नसल्याने तिने प्रियकराला बोलावून घेत दिल्ली विमानतळावरून पतीला गुंगारा देत पळ काढला. त्यानंतर दोघेही उज्जैन येथे दर्शनासाठी गेले. तेथून ते अकोल्यात आले. औंढा नागनाथ येथे जाण्याच्या तयारीत असताना रात्री अकोल्यातील एका लॉजमध्ये मुक्कामी थांबले. दिल्ली पोलिसांनी प्रियकरासोबत पळ काढणाऱ्या विवाहितेचे मोबाइल लोकेशन तपासले असता दोघेही अकोल्यात असल्याची माहिती मिळाली.
पतीसोबत जायला तिचा नकार
दिल्ली पोलिसांनी अकोला गाठले. त्यानंतर रामदास पेठ पोलिसांच्या सहकार्याने पत्नी व प्रियकराला १ जानेवारी रोजी ताब्यात घेतले. त्यानंतर पत्नीला पतीच्या स्वाधीन केले.
परंतु, पत्नीने पतीसोबत जाण्यास नकार देत प्रियकरासोबत जाण्यास पसंती दिली. त्यामुळे पोलिसांनी हस्तक्षेप करण्याचे टाळले. याप्रकरणी बुधवारी रात्री उशिरापर्यंत पोलिसांनी दप्तरी नोंद केली नव्हती.