नळाला मीटर, सिमेंट कॉक्रीट रस्त्यांचा मार्ग मोकळा
By Admin | Updated: July 17, 2015 01:58 IST2015-07-17T01:58:56+5:302015-07-17T01:58:56+5:30
मनपात नवा विक्रम; तब्बल ११ सभेच्या इतवृत्तांना एकाचवेळी मंजुरी.

नळाला मीटर, सिमेंट कॉक्रीट रस्त्यांचा मार्ग मोकळा
अकोला : पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी नळाला मीटर बसविण्यासह बहुप्रतीक्षित सिमेंट काँक्रीट रस्त्यांच्या निविदेचा मार्ग अखेर मोकळा झाला. या दोन्ही विषयांसह नेहरू पार्कमध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाला मंजुरी देण्याचा निर्णय गुरुवारी महापालिकेच्या स्थगित सर्वसाधारण सभेत घेण्यात आला. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या मुद्यावर विरोधकांनी गोंधळ घातला. या सभेत मागील ११ सभेच्या इतवृत्तांना मंजुरी देण्याचा विक्रम भाजप-शिवसेना युतीने घडवला. रस्ते दुरुस्तीसाठी प्राप्त १५ कोटींच्या अनुदानातून डांबरीकरणाचे ११, तर सिमेंट काँक्रीटच्या सात रस्ते दुरुस्तीचा निर्णय मनपाने घेतला. सिमेंट रस्त्यांच्या निविदेला सभागृहाची मंजुरी आवश्यक होती. २७ मे रोजी आयोजित सर्वसाधारण सभेत सिमेंट रस्ते, नळाला मीटर बसविणे, जीआयएस प्रणाली, सिटी बस सेवा सुरू करण्यासह मोर्णा प्रकल्प ते काटेपूर्णा प्रकल्पापर्यंंत नवीन जलवाहिनी टाकण्यासह कचरा संकलनाची निविदा मंजूर करण्याचा समावेश होता. ही सभा स्थगित झाल्यामुळे विकास कामांना ह्यब्रेकह्ण लागला होता. अखेर १६ जुलै रोजी मनपा मुख्य सभागृहात आयोजित सभेत महत्त्वाच्या विषयांना मंजुरी दिली. सिमेंट रस्त्याच्या निविदा प्रक्रियेवर शिवसेनेच्या गटनेत्या मंजूषा शेळके व ज्येष्ठ नगरसेवक सुनील मेश्राम यांनी विरोध नोंदवला. रस्ते दुरुस्तीअभावी अकोलेकरांना प्रचंड त्रास सहन करावा लागत असल्याचा मुद्दा ज्येष्ठ नगरसेवक विजय अग्रवाल यांनी मांडला. माजी उपमहापौर रफीक सिद्दीकी यांनी अग्रवाल यांच्या सूचनेला अनुमोदन दिले. महापौर उज्ज्वला देशमुख यांनी २१ ऑगस्ट २0१४ ते २२ एप्रिल २0१५ पर्यंंतच्या कालावधीत घेतलेल्या तब्बल ११ सभांच्या इतवृत्ताला मंजुरी दिली. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचा झालेला विरोध वगळता इतर विषयांवर सखोल चर्चा करणे काँग्रेस-राष्ट्रवादी व भारिपने टाळले.