क्रिप्टो करन्सीच्या माध्यमातून कोट्यावधी रूपयांनी फसवणूक; सिव्हिल लाइन पोलिस ठाण्यात सहा जणांविरूद्ध गुन्हा दाखल

By नितिन गव्हाळे | Published: December 23, 2023 10:40 PM2023-12-23T22:40:00+5:302023-12-23T22:40:27+5:30

गोयनका लेआऊमधील रवि नगरात राहणारे डॉ. किशोर श्रीधरराव ढोणे(४५) यांनी पोलिस अधीक्षकांकडे तक्रार केली होती.

Fraud of crores of rupees through crypto currency; A case has been registered against six people in Civil Line Police Station | क्रिप्टो करन्सीच्या माध्यमातून कोट्यावधी रूपयांनी फसवणूक; सिव्हिल लाइन पोलिस ठाण्यात सहा जणांविरूद्ध गुन्हा दाखल

क्रिप्टो करन्सीच्या माध्यमातून कोट्यावधी रूपयांनी फसवणूक; सिव्हिल लाइन पोलिस ठाण्यात सहा जणांविरूद्ध गुन्हा दाखल

अकोला: क्रिप्टो करन्सीच्या माध्यमातून दररोज दोन टक्के, मासिक ६० टक्के व वार्षिक ७२० टक्के इतकी रक्कम देण्याचे आमिष दाखवून अकोला शहरातील २५ जणांची कोट्यावधी रूपयांची फसवणूक केल्या प्रकरणात सिव्हिल लाइन पोलिसांनी शुक्रवारी सहा जणांविरूद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.

गोयनका लेआऊमधील रवि नगरात राहणारे डॉ. किशोर श्रीधरराव ढोणे(४५) यांनी पोलिस अधीक्षकांकडे तक्रार केली होती. त्या तक्रारीनुसार प्रदीप खाडे, अक्षय प्रदीप खाडे, आशय प्रदीप खाडे सर्व रा. खेडकर नगर, अकोला, राजेंद्र उपाध्ये रा. नाशिक, वाल्मिक ढोणे रा. अमरावती यांची विवेक फुलाडी यांच्या मार्फत त्यांच्याशी ओळख झाली होती. १३ फेब्रुवारी २०२२ ला एका लॉन्समध्ये प्लॅटिन अल्टिमा या नावाने क्रिप्टो करन्सी कॉइन संदर्भात माहिती देण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन प्रदीप खाडे (६२) यांनी केले होते. या कार्यक्रमात कंपनीचे रँक होल्डर राजेंद्र उपाध्ये (रा. नाशिक) व वाल्मीक ढोणे (रा. अमरावती) यांनी मार्गदर्शन केले होते. यावेळी त्यांनी गुंतवणूकदारांना दहापट रक्कम देण्याचे आमिष दाखवून पैसे परतीची हमी दिल्याचा आरोप तक्रारीत केला आहे. 

स्कीममध्ये ज्यांनी पैसे गुंतविले त्यांच्या मोबाईलवर स्मार्ट कॉन्टॅक्ट प्लॅटिन अल्टिमा कॉइन व प्लॅटिन अल्टिमा वॉलेट हे ॲप डाऊनलोड करून देत, बारकोड तयार करून देण्यात आले. डॉ. ढोणे यांनी स्वत:सह पत्नीच्या नावाने ८ लाख रूपये यात गुंतविले होते. करारानुसार स्मार्ट कॉन्टॅक्ट एक वर्षाचा असताना कंपनीने त्यात वारंवार बदल केले. खाडे यांनी ९० टक्के गुंतवणूकदारांची रोख रक्कम घरीच स्वीकारली. तसेच काही लोकांची फोनपे/गूगल पे द्वारे रक्कम घेतल्याचाही आरोप तक्रारीतून करण्यात आला आहे. अक्षय खाडे यांनी प्रत्येक गुंतवणुकदाराला 'प्लॅटिन अल्टिमा क्रिप्टो करन्सी'चे फिजिकल ऑफिसमध्ये दुबईला जाऊन बघितल्याचे सांगितले. 

या कंपनीचे क्रिप्टो बँक, क्रिप्टो एटीएम आहेत व भारतात सप्टेंबर २०२२ मध्ये लवकरच फिजिकल ऑफिस सुरू होणार असल्याचे खोटे सांगितले. गुंतविलेल्या रकमेवर वार्षिक ७२० टक्के प्रॉफिट करून देतो म्हणजे गुंतविलेले रकमेवर महिन्याला ६० टक्के असे लेखी पुरावे गुंतवणूकदारांकडे असल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. 

स्मार्ट कॉन्टॅक्टच्या नावावर खाडे परिवाराने हजारो गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचा आरोप करीत, गुंतवणूकदारांनी विचारणा केल्यावर खाडे हे उडवाउडवीचे उत्तरे द्यायचे. असे तक्रारीत म्हटले आहे. तक्रारीवरून सिव्हिल लाइन पोलिसांनी विविध कलमांन्वये गुन्हे दाखल केले आहेत.
 

Web Title: Fraud of crores of rupees through crypto currency; A case has been registered against six people in Civil Line Police Station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.