दीपाली चव्हाण आत्महत्येच्या मुळाशी वनतस्कर - ॲड. आंबेडकर यांचा दावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 20:37 IST2021-03-31T20:37:42+5:302021-03-31T20:37:53+5:30
Prakash Ambedkar on Deepali chavan suside case : सरकार या दृष्टीने तपास करत नसेल तर आठवडाभरात आम्ही सत्य समाेर आणू, असे आव्हानही ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी दिले.

दीपाली चव्हाण आत्महत्येच्या मुळाशी वनतस्कर - ॲड. आंबेडकर यांचा दावा
अकाेला : दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येचा तपास हा वरवर केला जात असून, त्यांनी ज्यांच्यासंदर्भात चाैकशी मागितली हाेती अशी प्रकरणे बाहेर काढा. त्याचे धागेदाेरे थेट मेळघाटातील वनतस्करांपर्यंत विशेषत: वाघांची शिकार आणी सागाची तस्करी करणाऱ्यांपर्यंत पाेहाेचतील, असा दावा वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केला. सरकार या दृष्टीने तपास करत नसेल तर आठवडाभरात आम्ही सत्य समाेर आणू, असे आव्हानही त्यांनी दिले.
ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी बुधवारी अकाेल्याच्या विश्रामगृहात आयाेजित पत्रकार परिषदेत हा दावा केला. ते म्हणाले की, दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येचे प्रकरण हे केवळ सरकारी अधिकाऱ्याकडून हाेणारा त्रास इथपर्यंत मर्यादित नाही. या मागे तस्करांची माेठी साखळी आहे. दीपाली यांनी त्यांच्या कार्यकाळात ज्यांची ज्यांची चाैकशी मागितली हाेती, ती प्रकरणे बाहेर काढली तर या मागील सूत्र समाेर येईल, असा दावा त्यांनी केला. दीपाली चव्हाण यांच्यावर दाेन वेळा ॲट्राॅसिटीचे गुन्हे दाखल झाले. त्यांना उच्च न्यायालयाने जामीन दिला. या गुन्ह्यातील फिर्यादी काेण आहेत, त्यांची आर्थिक स्थिती काय याचा तपास करून सत्य जनतेसमाेर आणावे. या वनतस्करांना वाचविण्यासाठीच दीपाली यांना जाणीवपूर्वक छळण्यात आले आहे, त्यामुळे शिवकुमार व रेड्डी यांची साखळी समाेर येण्यासाठी तपास केल्यास या आत्महत्येमागील षडयंत्र समाेर येईल. राज्य सरकारने आठ दिवसात या दृष्टीने माहिती समाेर न आणल्यास वंचितच्या नेत्या प्रा. निशा शेेंडे या प्रकरणातील सत्य जाहीर करतील, असे आव्हानही त्यांनी सरकारला दिले.
रेड्डींना सहआराेपी करा
अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक एम एस. रेड्डी यांनी जाणीवपूर्वक दीपाली यांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे त्यांना या प्रकरणातील सत्य माहीत आहे, त्यामुळे केवळ रेड्डी यांचे निलंबन करून थांबू नका, त्यांना सहआराेपी केल्यास या प्रकरणातील काळी बाजू समाेर येईल. त्यामुळे या प्रकरणात रेड्डी यांना सहआराेपी करण्याची मागणी ॲड. आंबेडकर यांनी केली.