बसमध्ये झोप लागली अन् ४१ ग्रॅम सोन्याचे दागिन्यांची झाली चोरी
By नितिन गव्हाळे | Updated: May 26, 2023 18:58 IST2023-05-26T18:58:16+5:302023-05-26T18:58:29+5:30
याप्रकरणात सिटी कोतवाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

बसमध्ये झोप लागली अन् ४१ ग्रॅम सोन्याचे दागिन्यांची झाली चोरी
अकोला : मूर्तिजापूर-अकोला एसटी बसने प्रवास करीत असताना, महिला प्रवाशाला झोप लागली. दरम्यान, अज्ञात चोरट्याने बॅगेतील ४१ ग्रॅम सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना बुधवारी (दि. २४) रात्री ८ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणात सिटी कोतवाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
मूर्तिजापूर तालुक्यातील खरब ढोरे येथील रश्मी स्वप्निल ढोरे (४०) यांच्या तक्रारीनुसार २४ मे रोजी सायंकाळी ६.३० वाजता अकोल्यात येण्यासाठी त्या मोठी बहीण मुलांसह मूर्तिजापूर बसस्टॅण्डवरून बसमध्ये बसल्या. सोबत लेदर बॅगसह आणखी एक कापडची बॅग होती. त्यात सोन्याचा गोफ, लॉकेट, चपलाहार, कानातील टॉप्स, रिंग, गुळे, टॉप्स असे एकूण ४१ ग्रॅम सोन्याचे दागिने होते. या दागिन्यांची किंमत एक लाख ३४ हजार रुपये आहे. रश्मी ढोरे यांच्या बाजूने एक अनोळखी महिला मूर्तिजापूर बसस्टॅण्डवरून बसमध्ये बसली होती.
त्या महिलेच्या पायाजवळ सीट खाली बॅग ठेवली होती. बसमध्ये बसण्यापूर्वी त्यांच्या डॉक्टर पतीने गोळी दिली होती. त्यामुळे त्यांना बसमध्ये झोप लागली. अकोल्यात आल्यावर सर्वजण बहिणीच्या घरी गेले. घरी गेल्यावर बॅगेत दागिने नसल्याचे समोर आले. दरम्यान, शेजारी बसलेल्या महिलेने त्यांच्या बॅगेतील दागिने लंपास केल्याचा संशय त्यांनी तक्रारीतून व्यक्त केला आहे. याप्रकरणात सिटी कोतवाली पोलिसांनी अज्ञात महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.