शेतीच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी गेलेल्या दिवाकर रावतेंवर ओढवला शेतकऱ्यांचा रोष
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2019 18:19 IST2019-11-02T18:16:21+5:302019-11-02T18:19:40+5:30
रावते यांना शेताच्या बांधावर न जाताच माघारी फिरावे लागले.

शेतीच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी गेलेल्या दिवाकर रावतेंवर ओढवला शेतकऱ्यांचा रोष
अकोला - अवकाळी पावसामुळे राज्याच्या सर्व भागात शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी विविध पक्षांचे नेते आणि राज्य सरकारमधील मंत्री शेतशिवारांना भेटी देत आहेत. दरम्यान, अकोला येथे पिकांच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी गेलेल्या दिवाकर रावते यांना शेतकऱ्यांच्या रोषाचा सामना करावा लागला. त्यामुळे रावते यांना शेताच्या बांधावर न जाताच माघारी फिरावे लागले.
राज्य सरकारमधील परिवहन मंत्री दिवाकर रावते हे पीक नुकसानीची पाहणी करण्यासाठी आज अकोला जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. मात्र कौलखेड जहाँगिर परिसरात रावते आले असता ग्रामस्थांनी शेताच्या बांधावर जाण्यास विरोध केला. तुम्ही सरकारमध्ये असताना शेतकऱ्यांसाठी काय केले, असा जाब विचारत शेतकऱ्यांनी रावतेंना घेराव घातला. यावेळी शिवसेनेचे नवनिर्वाचित आमदार नितीन देशमुख यांनी ग्रामस्थांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला; परंतु ग्रामस्थ ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याचे पाहून रावते यांनी तेथून काढता पाय घेतला.