शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2019 13:50 IST2019-11-26T13:49:53+5:302019-11-26T13:50:00+5:30
नापिकी आणि सततच्या पावसामुळे शेतकरी अडचणीत आला होता, त्यामुळे त्यांनीही टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली.

शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या
अकोला : मूर्तिजापूर तालुक्यातील कंझरा गावानजीक असलेल्या लोधीपूर या गावातील एका युवा शेतकºयाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सायंकाळच्या सुमारास घडली. या शेतकºयावर कर्जाचा डोंगर असून, नापिकी आणि सततच्या पावसामुळे शेतकरी अडचणीत आला होता, त्यामुळे त्यांनीही टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली.
लोधीपूर येथील रहिवासी निखिल गजानन वानखडे (२६) यांच्याकडे तीन एकर शेती असून, ही शेती पीकविण्यासाठी त्यांनी बँका तसेच खासगी सावकाराकडून कर्ज घेतले होते. पीक हाती आल्यानंतर कर्जाची परतफेड करण्याचा त्यांचा मानस होता; मात्र यावर्षी हातातोंडाशी आलेल्या पिकाची पाण्यामुळे नासाडी झाली, त्यामुळे निखिल वानखडे प्रचंड संकटात आले होते. कर्ज फिटणार नाही, तसेच पुढील वर्षीच्या पेरणीच्या संकटामुळे त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. निखिल वानखडे यांना तीन वर्षांची मुलगी तर सहा महिन्यांचा मुलगा असल्याची माहिती आहे. निखिल त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्यामुळे वानखडे यांचे कुटुंबीय उघड्यावर आले आहेत.