भाजपतर्फे शुक्रवारी आंदाेलन
अकाेला : काेराेनाच्या कालावधीत नागरिकांना वीज देयकांचे वाटप करणाऱ्या शासनाने वाढीव वीज देयकातून दिलासा देण्याचे आश्वासन दिले हाेते. परंतु, आता वीज देयक जमा न केल्यास वीज खंडित करण्याचा इशारा देण्यात आल्यामुळे येत्या ५ फेब्रुवारीला जिल्ह्यात व शहरात वीज वितरण कार्यालयाला ताला ठोको व वीज बिलाची होळी करण्याचा इशारा भाजपने दिला आहे.
माेकाट कुत्र्यांचा उच्छाद
अकाेला : शहरात माेकाट कुत्र्यांचा सुळसुळाट झाला आहे. जुने शहरातील भांडपुरा चाैक, गुलजारपुरा चाैक, दगडी पूल, कमला वाशिम बायपास चाैक, उमरी, माेहम्मद अली चाैकातील मच्छी मार्केट, आदी उघड्यावर मांस विक्रीच्या ठिकाणी माेकाट कुत्र्यांच्या झुंडी आढळून येतात. यामुळे नागरिकांचा जीव धाेक्यात सापडला आहे.
जलवाहिनीसाठी खड्डा खाेदला!
अकाेला : जुने शहरातील प्रभाग क्रमांक ९ अंतर्गत येणाऱ्या श्रीवास्तव चाैकात जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी भला माेठा खड्डा खाेदण्यात आला आहे. या खड्डयाच्या बाजूला बॅरिकेड लावणे अपेक्षित हाेते. तसे न केल्यामुळे वाहनचालकांच्या अपघाताची शक्यता बळावली आहे.
मनपात नवीन विद्युत साहित्य
अकाेला : महापालिका कार्यालयातील जुने विद्युत साहित्य काढून त्याऐवजी नवीन विद्युत साहित्य लावण्यात येणार आहे. नवीन साहित्यामुळे विद्युत देयकांत बचत हाेणार असल्याचा दावा प्रशासनाकडून केला जात आहे. दरम्यान, या कामासाठी प्रसिद्ध केलेल्या निविदेवर शिवसेनेने आक्षेप नाेंदविल्यामुळे मनपासमाेर तांत्रिक पेच निर्माण झाला आहे.
आधार अपडेटसाठी नागरिकांची गर्दी
अकाेला : आधार कार्डमधील नावात, जन्मतारखेत व रहिवासी पत्त्यामध्ये किरकाेळ दुरुस्ती करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने शहरात विविध भागात आधार नाेंदणी केंद्र सुरू केले आहेत. साेमवारी जुने शहरातील पश्चिम झाेनमधील नाेंदणी केंद्रांत आधार अपडेटसाठी नागरिकांची चांगलीच गर्दी झाल्याचे दिसून आले.
जन्म, मृत्यू दाखल्यासाठी रांग
अकाेला : जिल्हा सामान्य रुग्णालय किंवा जिल्हा स्त्री रुग्णालय वगळता शहरातील सर्व खासगी हाॅस्पिटलमध्ये जन्माला आलेल्या नवजात बाळाच्या जन्म दाखल्याची नाेंद महापालिकेत करणे बंधनकारक आहे. ही नाेंद केल्यानंतर मनपाकडून जन्म व मृत्यूचा दाखला दिला जाताे. दाखल्यासाठी मनपात रांग लागल्याचे बुधवारी पाहावयास मिळाले.
मुख्य नाली बुजवली
अकाेला : टाॅवर चाैक ते रतनलाल प्लाॅट मार्गावरील जिल्हा परिषद अध्यक्षांच्या निवासस्थानासमाेर मुख्य नाली बुजविण्यात आल्यामुळे परिसरातील हाॅस्पिटल, इमारतींमधील सांडपाणी रस्त्यात साचत असल्याचे चित्र समाेर आले आहे. मनपाच्या आराेग्य निरीक्षकांनी ही समस्या निकाली काढण्याची गरज आहे.
उर्दू शाळेच्या आवारात अतिक्रमण
अकाेला : जिल्हा परिषदेच्या अखत्यारित असलेल्या रतनलाल प्लाॅट चाैकातील उर्दू शाळेच्या आवारात स्थानिक रहिवाशांनी माेठ्या प्रमाणात अतिक्रमण उभारल्याचे समाेर आले आहे. व्यावसायिक उद्देशातून भंगार साहित्याचे पाेते या ठिकाणी ठेवण्यात आले आहेत. याकडे जिल्हा परिषद प्रशासनाचे दुर्लक्ष हाेत आहे.